साहित्यरत्ने

आपण जर आपल्या कर्तव्यावर जोर देत गेलो, तर आपले हक्क व अधिकार आपल्याकडे आपोआप चालत येतात. - स्वामी रामतीर्थ

सर्वच प्रश्न सोडवून सुटत नसतात. काही प्रश्न सोडून दिले की सुटतात. - विनोबा भावे

असाध्य ते साध्य करता सायास
कारण अभ्यास तुका म्हणे - संत तुकाराम

सगळे वार परतवता येतात, अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही. - व. पु. काळे

आई असेपर्यंत तिची किंमत वाटत नाही. पण ती गेल्यावर मग जगात कशाचीच किंमत वाटत नाही. - आचार्य अत्रे

आईच्या डोळयांतील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात. - वि. स. खांडेकर

स्वामी तिन्ही जगांचा आईविना भिकारी - कवी यशवंत

चवीला बळी न पडता जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खाणे याचे नाव सात्विक आहार. - श्री. गोंदवलेकर महाराज

काम करून मनुष्य मरत नाही. तो आळसाने मरतो. - वि. का राजवाडे

परमेश्वर इतर काही देत नाही. तो प्रयत्नास यश देतो. - महात्मा गांधी

समोर अंधार असला तरी त्यापलिकडे उजेड आहे हे लक्षांत ठेवा. - लो. टिळक

माता आणि मातृभूमी यांचा विसर पडू देऊ नका. ती तुमची दैवते आहेत. - गिरिजा कीर

ऊठ ऊठ माज्या जीवा, काम पडलं अमाप
काम करता करता, देख देवाजीचं रूप - बहिणाबाई चौधरी

कर्म म्हणजे प्रत्यक्ष सेवा, भक्ती म्हणजे सेवा-भाव. - विनोबा भावे

कला म्हणजे सत्य, शिव आणि सुंदर यांचे संमेलन. - साने गुरुजी
आज गरिबांच्या ठिकाणी गरिबी असेल, पण दैन्य असता कामा नये. जेथे गरिबी असूनही दीनता नसेल, तेथे सामर्थ्य उत्पन्न होते. - आचार्य दादा धर्माधिकारी

स्वर्गापेक्षा मी चांगल्या पुस्तकांचे स्वागत करीन. कारण पुस्तक जिथे असेल तिथे स्वर्ग निर्माण होईल. - लो. टिळक
ग्रंथसंपत्तीवरून त्या समाजसंस्कृतीचे निदान होते. - बाळासाहेब भारदे

होईल जीवनाची उन्नती,
ज्ञान-विज्ञानाची प्रगती
ऐसीच असावी ग्रंथसंपत्ती
गावोगावी - संत तुकडोजी

अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तवा मिळते भाकर - बहिणाबाई चौधरी

घर म्हणजे आधार, घर म्हणजे आशा, घर म्हणजे विसावा. घर म्हणजे प्रेम. घर म्हणजे आत्मीयता. - साने गुरुजी

खरे असेल तेच बोलावे, उदात्त असेल तेच लिहावे,
उपयोगी तेच शिकवावे, देशाचे हित ज्यात असेल तेच करावे. - शि. म. परांजपे

जीवन हे विचार, अनुभव आणि श्रध्दा ह्यांचे घनफळ आहे. - विनोबा भावे

एखाद्या तत्वासाठी मरणे तर कठीणच आहेच, पर त्याहीपेक्षा एखाद्या तत्वासाठी जगणे अधिक कठीण आहे. कारण मरावे एकदाच लागते आणि जगावे मात्र अनेक वर्षे लागते. - कवी कुसुमाग्रज

नवा सूर्य उगवत आहे,
नवे तेज उसळत आहे,
या मातीच्या कणाकणांतून
नवा माणूस प्रगटत आहे - कवी सुधांशु

दुरितांचे तिमीर जावो
विश्व स्वधर्मसूर्य पाहो
जो जो वांछील तो ते लाहो
प्राणिजात - संत ज्ञानेश्वर

बिनभिंतीची इथली शाळा, लाखो इथले गुरू
झाडे, वेली, पशुपाखरे यांची संगत धरू - राजा मंगळवेढेकर

जगात दुसऱ्याला हसण्याइतके सोपे व दुसऱ्यासाठी रडण्याइतके कठीण काम कोणते नाही. - साने गुरुजी

जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले
तोचि साधु ओळखावा देव तेथेचि जाणावा - संत तुकाराम

खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे - साने गुरुजी

तू सागर करुणेचा, देवा तुजलाचि दु:ख सांगावे
तुजवाचुनि इतरासी, दिनमुख पसरोनि काय मागावे - महात्मा ज्योतिबा फुले

पेरिले ते उगवते
बोलण्यासारिखे उत्तर येते
तरी मग कर्कश बोलावे तें
काय निमित्यें - श्री समर्थ रामदास

भावेविण भक्ती, भक्तीवीण मुक्ती
बळेवीण शक्ती, बोलू नये - श्री. संत ज्ञानेश्वर

मरणात खरोखर जग जगते
आधि मरण, अमरपण मग ते - भा. रा. तांबे