डॉलर बहू - सुधा मूर्ती

- सौ. शुभांगी सु. रानडे, ज्ञानदीप, सांगली
माझ्या बाबतीत तरी असं पुष्कळ वेळा होतं की एखादी गोष्ट आपण शोधत असतो पण ती आपल्याला मिळत नाही. अशावेळी आपल्याला तिचा ध्यास लागतो. आणि अचानकपणे ती आपल्या हाती पडली तर आपणास होणारा आनंद इतका विलक्षण असतो की त्याचे वर्णन करण्यासाठी शब्दही अपुरे पडतात. आपण अवाक्‌‌च होऊन जातो. त्याचं काय झालं, नेहमीप्रमाणे मी परवा गावातल्या वाचनालयात गेले होते. बराच वेळ शोधाशोध करून सुद्धा मनाजोगते पुस्तक मिळत नव्हते म्हणून मी काहीशी खट्टू झाले होते. ‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन ’ अशी माझी गत झाली. डॉ. सौ. सुधा मूर्ती यांची ‘डॉलर बहू ’ ही कादंबरी अनपेक्षितपणे समोर दिसली. मी लगेचच ती घेतली. या कादंबरीबद्दल बर्‍याचजणांकडून फार चांगल्या प्रतिक्रिया ऎकल्या होत्या. पण माझा वाचनाचा योग मात्र काही केल्या जमून आला नव्हता. घरी जाऊन केव्हा एकदा ती कादंबरी वाचायला घेते असे मला होऊन गेले.
वाचता वाचता वेळेचे सुद्धा मला भान उरले नाही आणि पहाट कधी झाली ते समजलेच नाही. पुस्तक वाचून हातावेगळे केले होते. मनाला विचार करायला बरेच खाद्य मिळाले होते. मूळ कन्नड लेखिका सुधा मूर्ती याच्या या कादंबरीचा मराठी अनुवाद सौ. उमा वि. कुलकर्णी यांनी केलेला आहे. प्रस्तुत कादंबरीचा विषय तसा सर्वपरिचित असाच आहे. तो म्हणजे ‘ सासू - सून संबंध ’. अत्यंत तरल असा हा विषय विचारपूर्वक मांडणी करून, कुशलपणे उलगडून दाखविण्यात लेखिका यशस्वी झालेली दिसते. यातील बहुतेक सर्व पात्रे ही मध्यमवर्गीय आहेत. त्यांच्या भावभावनांचे धागे हळुवारपणे उकलण्याचे अवघड काम लेखिकेच्या - सुधाताईंच्या लेखणीने मोठ्या कल्पकतेने केलेले दिसते. प्रत्येक पात्राच्या मनात सहजपणे डोकावून बघण्याची त्यांची धाटणी विलक्षण आहे. पात्रांची जडणघडण ही लेखिकेची खासियत आहे. मध्यमवर्गीय सासूचे यथायोग्य चित्रण करण्यात लेखिकेने बारीकसारीक तपशीलही न विसरता घातलेला दिसतो.
शामण्णा एक अत्यंत सरळ स्वभावाचे माध्यमिक शिक्षक. पत्नी गौरी (गौरम्मा), दोन मुलगे व एक मुलगी. घरातील सर्व कामे स्वतः करून काटकसरीने संसार चालविणार्‍या गौरम्मांवा स्वभाव तसा महत्वाकांक्षी. भरजरी रेशमी साड्या हिर्‍यामोत्याचे दागिने असल्या गोष्टींची त्यांना भारी हौस. मध्यमवर्गीय कुटुंबातील एखादी व्यक्ती जर परदेशात (आणि त्यातल्यात्यात जगातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणार्‍या अमेरिकेसारख्या देशात) जाऊन नोकरी करू लागली तर त्या कुटुंबाचे एकंदर चित्रच बदलून जाते. त्यावा आर्थिक दर्जा व अपेक्षा उंचावतात. रुपयाऎवजी रुपयापेक्षा ४० पटीने मोठा असणारा डॉलर जेंव्हा घरात घुसतो तेंव्हा तो त्या घराची कशी धूळधाण उडवून देतो याचे यथातथ्य वर्णन लेखिकेच्या समर्थ लेखणीतून उतरलेले दिसते. पैसा हा माणसाला कुठल्याकुठे घेऊन जातो. पण त्याचवेळी त्याच्यातील माणूसकीचा झराही आटायला लागलेला दिसतो.
सर्व सुखसोयींनी युक्त, मुबलक पैसा असणार्‍या अमेरिकेत राहून नोकरी करणारी मुलगा-सून व गौरम्मासारखी सासू यांच्याभोवती कथानकाची मुख्य गुंफण झालेली दिसते. दुसरा मुलगा बॅंकेत क्लार्कची नोकरी करणारा. त्याची पत्नी उत्तम गायिका, कलागुणसंपन्न, कष्टाळू, जणू विनम्रतेची पुतळीच असणारी विनिता हे तुलनेने कमी पैसे मिळवत असतात. त्यामुळे गौरम्माकडून त्यांचा पदोपदी केला जाणारा अपमान दाखवून लेखिकेने सासूच्या स्वभावातील अनेक बारीकसारीक छटा टिपण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. वर्षभर अमेरिकेत राहिल्यावर याच गौरम्माला असली-नकलीमधला फरक समजतो. त्यामुळे भारतात परत आल्यावर विनीता या आपल्या दुसर्‍या सुनेशी अत्यंत प्रेमळपणे वागण्याचे ती ठरविते. पण आता वेळ निघून गेलेली असते. गौरम्माकडून विनीताला डॉलर महिमा तसेच डॉलर सुनेचे गुणवर्णन ऎकून अपमानित होण्याची वेळ येऊ नये म्हणून शामण्णा (विनीताचे सासरेच) तिला धारवाडला नोकरी करून वेगळे राहण्याचा सल्ला देतात. यामुळे कथेला चांगली कलाटणी मिळाली आहे.
अत्याधुनिक सुखसोयींनी संपन्न असणार्‍या अमेरिकेत राहणारे भारतीय लोकही सुखात असतातच असे नाही असाही निष्कर्ष लेखिकेने काढलेला आहे.तसेच एकेकाळी गरिबीत राहून कष्टमय जीवन जगणारी माणसे अचानकपणे हाती आलेल्या स्वर्गसुखाने कशी बदलून जातात हे दाखवून देण्यासाठी अशा अनेक छोट्यामोठ्या उपकथानकांची योजनाही केलेली आहे. लेखिकेने दोन व्यक्तीतील, दोन पिढ्यातील, दोन संस्कृतीतील, दोन चलनातील, दोन मनातील अंतर तसेच गरीब-श्रीमंतीतील प्रचंड दरीचे विदारक दर्शन घडविले आहे. ‘दुरून डोंगर साजरे’ किंवा ‘करावे तसे भरावे’ याचेही प्रत्यंतर आणून देण्याचा लेखिकेचा मानस स्पष्टपणे जाणवतो. आपल्याकडची श्रावणी शुक्रवारची कहाणी हाच धडा शिकवते असे वाटते.
मला असे वाटते की, या कादंबरीमुळे महत्वाच्या सामाजिक प्रश्नावर प्रकाश पडला आहे. डॉलरच्या जगात राहणारी, डॉलर मिळवणारी बहू म्हणजे सून ही शोधायला अमेरिकेतच जायला पहिजे असे नाही. आपल्याकडेही अशा डॉलर बहू दिसतील. याउलट लेखिकेची बहीण जयश्री देशपांडे ही अनेक वर्षे अमेरिकेत वास्तव्य करूनही भारतीय मनोभावना जपणारी व डॉलर बहू झाली नाही याचाही उल्लेख लेखिकेने केला आहे. तिलाच ही कादंबरी अर्पण करून सर्वांनी तिचे अनुकरण करावे अशी इच्छा दर्शविली आहे.
मराठी साहित्यात या कादंबरीने फार मोलाची भर घातली आहे. मूळ लेखिका व अनुवादिका यांचे मनःपूर्वक अभिनंदन !
संदर्भ - डॉलर बहू
मूळ कन्नड लेखिका - सुधा मूर्ती
मराठी अनुवाद - सौ. उमा वि. कुलकर्णी
अमेय प्रकाशन, पुणे