नाट्यपंचकम्‌

एखाद्या चित्रकलादालनात हजारो चित्रे आकर्षक रीतीने मांडलेली असावीत आणि त्यातील पहिल्या चार - पाच चित्राची निवड करण्याचे काम तुमच्यावर सोपविले असावे. ती निवड का केली याची सविस्तर कारणमीमांसा करण्याची जबाबदारीही तुमचीच. अशा वेळी नाही म्हटली तरी परीक्षकाची सुद्धा परीक्षाच असते. अर्थात पट्टीचा परीक्षक त्याला पुरून उरतो. तसेच काहीसे ‘नाट्यपंचकम्‌’ या पुस्तकाबाबत दिसते. गेल्या ५० वर्षात नाट्यक्षेत्रात अनेक व्यक्ती आल्या आणि गेल्या. नाटक ही सांघिक कृती असते. नाटकाची भट्टी उत्तम जमून येण्यासाठी अनेक निरनिराळ्या घटकांची जरुरी असते. लेखक, दिग्दर्शक, कलाकार, नेपथ्यकार, संगीतकार एक ना दोन ! त्यातील अनेकांनी आपल्या कारकीर्दीत घवघवीत यश संपादन केले. अशा व्यक्तींमधून केवळ पाच सर्वोत्कृष्ट व्यक्ती निवडून त्यांच्या कार्याचा समग्र आलेख काढणे हे साध्यासुध्या माणसाचे काम नव्हे. त्यासाठी त्या तोलामोलाचा परीक्षक पाहिजे. अत्यंत अवघड स्वरूपाचे हे कार्य लेखक वि. भा. देशपांडे यांनी मोठ्या कौशल्याने करून योग्य तो न्याय दिलेला आहे.
नाट्यपंचकम्‌
लेखक - वि. भा. देशपांडे
प्रतीक प्रकाशन, पुणे
किंमत १०० रू.
नाट्यपंचकम्‌ ह्या महान्‌ वटवृक्षाच्या पाच महत्वाच्या शाखा म्हणजे - नाटककार विजय तेंडुलकर, उत्कृष्ट कलाकार डॉ. श्रीराम लागू, नाट्यदिग्दर्शक दामू केंकरे, सदाबहार कलाकार श्रीकांत मोघे आणि सर्वच क्षेत्रात समर्थपणे नाट्यलेखन करणारे रत्नाकर मतकरी. आपापल्या कलाक्षेत्रात आभाळाएवढी उंची गाठलेली ही उत्तुंग व्यक्तिमत्वे वाचकांसमोर सादर करून लेखकाने वाङ्मयीन कलादालनात फार मोलाची भर घातली आहे.
१९५० पासून नाट्यक्षेत्रात अग्रणी असणारे विजय तेंडुलकर म्हणजे सृजनशील, चिंतनशील, वादग्रस्त नाटककार व प्रभावी पत्रकारही होते. कथा, कादंबरी, एकांकिका, बालनाट्य, प्रौढ नाटके, पटकथालेखन, स्फुटलेखन, स्तंभलेखन असे वैविध्यपूर्ण भरजरी लेखनकार्याचे सुयोग्य मूल्यमापन केलेले आहे. डॉ. श्रीराम लागू यांच्या भूमिकांचा पल्ला तर केवळ बिनतोड, स्तिमित करणारा आहे. सर्वोत्कृष्ट कलाकार कोणत्याही भूमिकेत पूर्णपणे झोकून देऊन काम करण्याची वृत्तीच डॉ. श्रीराम लागू यांना सर्वोत्कृष्ट कलाकाराचा बहुमान मिळवून देण्यास उपयुक्त ठरली. उत्तम अभिनेता, पट्टीचे दिग्दर्शक, नेपथ्यकार, अप्रतिम प्रकाशयोजना करणारे बहुरंगी व्यक्तिमत्व म्हणजे दामू केंकरे. यांच्या कार्याचा समग्र आढावा लेखकाने सविस्तरपणे घेतलेला आहे. जन्मजात देखणे रूप, उत्तम आवाज, स्वच्छ - स्पष्ट श्ब्दोच्चार, भूमिकेची - अभिनयाची पुरेपुर जाण असणारे चिरतरूण, हरहुन्नरी व्यक्तिमत्व आपल्याला श्रीकांत मोघे यांच्या रूपाने भेटते. नाट्यपरिषदेने ‘सर्वोत्कृष्ट नाटककार’ म्हणून गौरविलेल्या रत्नाकर मतकरींना ओळखत नाही असा माणूस विरळा ! पाच दशकांहून अधिक काळ बालरंगभूमी तसेच प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमीसाठीही सातत्याने अव्वल दर्जाचे लिखाण करत असतानाच त्याच्या जोडीला आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट या माध्यमातही तितक्याच सफाईदारपणे लेखणी चालविणार्‍या रत्नाकर मतकरींच्या कार्याचे लेखकाने सर्वार्थाने दर्शन घडविले आहे.