तंत्रविज्ञान व निसर्ग संग्रहालये

लहानपणापासूनच मुलांच्या मनात सभोवतालच्या परिस्थितीबद्दल व घडणार्‍या घटनांबद्दल जिज्ञासा असते. मूल का व कसे या प्रश्नांचा शोध घेत मोठे होते. या प्रश्नांना योग्य उत्तर देण्याची जबाबदारी पालक व शिक्षकांवर येऊन पडते. रोजच्या घाईगडबडीमुळे या सर्व प्रश्नांना उत्तरे मिळत नाहीत. बर्‍याच वेळा अशा प्रश्नांची उत्तरे पालकांना व शिक्षकांनाही माहीत नसतात. योग्य व यथार्थ माहिती मिळाली नाही तर अंधश्रद्धा वाढीस लागते.याउलट योग्य मार्गदर्शन मिळाले तर जिज्ञासू मूल संशोधक बनू शकते.

विज्ञानाच्या बाबतीत तर या जिज्ञासापूर्तीला अनन्यसाधारण महत्व आहे. विज्ञान प्रदर्शन हे निसर्ग व तंत्रज्ञानातील प्रगतीची प्रत्यक्ष माहिती मिळविण्याचे हे एक प्रभावी साधन आहे. त्याबरोबरच मुलांना स्वतःच्या हाताने विज्ञान प्रतिकृती बनविणे व त्याचे प्रदर्शन करणे मनापासून आवडते. शाळाकॉलेजात दरवर्षी अशी विज्ञान प्रदर्शने भरत असतात. भारतात अनेक मोठ्या शहरांत अशी कायमस्वरुपी मोठी विज्ञान प्रदर्शने व प्रत्यक्ष प्रयोग करता येऊ शकणारी छंद गृहे कार्यरत आहेत. मुंबईचे नेहरू प्लॅनिटोरियम व पुण्याचे होमी भाभा विज्ञान छंदगृह ही त्याचीच उदाहरणे होत. सांगली येथे महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी या संस्थेमार्फत विश्रामबाग येथे वालचंद महाविद्यालयानजिक असे प्रदर्शन उभारले जाणार आहे. त्याच्या संयोजनास साहाय्य व्हावे म्हणून परदेशातील अशा काही प्रदर्शनांची माहिती देत आहे.

अमेरिकेत अशी तंत्रविज्ञान प्रदर्शने व निसर्ग संग्रहालये जवळजवळ प्रत्येक शहरात आहेत. माझ्या अमेरिकेच्या दौर्‍यात मला अशा काही प्रदर्शनांना भेट देण्याची संधी मिळाली. त्यापैकी सॅन ओसे येथील टेकम्युझियम, ह्यूस्टन येथील निसर्गविज्ञान संग्रहालय व सॅन फ्रॅन्सिस्को येथील एक्स्प्लोरेटोरियम यांची माहिती खाली देत आहे.

सॅन ओसे येथील टेकम्युझियम-
या संग्रहालयात जैव अभियांत्रिकी, भूगर्भशात्र, अपारंपारिक ऊर्जा साधने, संगणकातील मायक्रोचिपचे डिझाईन व सिलिकॉन व्हॅलीतील संशोधनाचा इतिहास (संगणकक्षेत्रात अग्रेसर असणार्‍या कॅलिफोर्नियाला सिलिकॉन व्हॅली म्हटले जाते.) यांची माहिती देणार्‍या चलप्रतिकृती पहावयास मिळतात. मुलांना प्रयोग करून पाहण्यासाठी अनेक वैज्ञानिक खेळणी येथे आहेत. याविषयी सविस्तर माहिती http://www.thetech.org या संकेतस्थळावर पाहता येईल.

ह्यूस्टन येथील निसर्गविज्ञान संग्रहालय-
पुरातत्व काळापासून निसर्गात झालेल्या घडामोडींची माहिती, पृथ्वीवर निरनिराळ्या ठिकाणी असणारी निसर्गसंपदा, वृक्षवेली, पशुपक्षी, कीटक, जलचर या सर्वांची माहिती व्हावी या दृष्टीने याची उभारणी केली आहे. आफ्रिकेतील रेन फोरेस्ट प्रत्यक्षात पाहता यावे यासाठी काचेचा मोठा घुमट तयार केला असून जिवंत फुलपाखरांचे संग्रहालय हे याचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे सिद्ध करणारा फोकाल्टचा पेंड्युलम व डायनासोर प्रचंड मोठे सांगाडे ही येथील विशेष आकर्षणाची ठिकाणे आहेत. याविषयी सविस्तर माहिती http://www.hmns.org/ या संकेतस्थळावर पाहता येईल.


सॅन फ्रॅन्सिस्को येथील एक्स्प्लोरेटोरियम-
प्रचंड मोठ्या हॉलमध्ये ६५० हून जास्त वैज्ञानिक उपकरणे व चलप्रतिकृती असणारे हे संग्रहालय कॅलिफोर्नियात अतिशय प्रसिद्ध आहे. भूमिती, प्रकाश, गति, चुंबकत्व, आधुनिक विज्ञान या विषयांतील तत्वे बालांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना सहज समजावून देणारी खेळणी ( एवढ्या मोठ्या प्रतिकृतींना खेळणी म्हणणे बरोबर नाही) येथे आहेत. याविषयी सविस्तर माहिती http://www.exploratorium.edu या संकेतस्थळावर पाहता येईल.


या सर्व प्रदर्शनाला प्रत्यक्ष भेट देणे सर्वांना शक्य नसले तरी www.youtube.com या संकेतस्थळावर याच्या व्हिडिओ क्लिप पहावयास मिळतील.

विज्ञान व इतर सर्व विषयांवर इंटरनेटवर असणार्‍या अशा अमूल्य माहितीच्या खजिन्याची माहिती घेण्यासाठी या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. आपल्या कल्पना, लेख व माहिती यांना या संकेतस्थळावर आपल्या नावानिशी प्रसिद्धी देण्यात येईल. मोफत सदस्य होऊन माहिती व ध्वनीचित्रफिती डाऊनलोड करण्याच्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ज्ञानदीप एज्युकेशन अँड रिसर्च फौंडेशन आपणास करीत आहे.