पन्हाळा
|
||
कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि शहराच्या वायव्येस असणारा पन्हाळा हा किल्ला शिव छत्रपतींचा आणि संभाजीराजांचा आवडता किल्ला. मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ राजधानी असणारा हा किल्ला इतिहासाच्या दृष्टीने आणि आज पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा किल्ला आहे. शिवछत्रपतींच्या पराक्रमाच्या अनेक आठवणी इथे या किल्ल्याच्या छायेत वावरताना येतात. आधुनिकदृष्ट्या थंड हवेचे ठिकाण असणारा हा किल्ला तसा निसर्गनिर्मित आहे. कोल्हापूरच्या वायव्येस १२ मैलावर समुद्र सपाटीपासून ३१२७ फूट उंचीवर आणि कोल्हापूरपासून १००० फूट उंचीवर आहे. हा किल्ला छत्रपती शिवरायांनी प्रथम तारीख २८ नोव्हेंबर १६५९ रोजी घेतला. नंतर पुन्हा विजापूर अदिलशहाच्या ताब्यात गेला. पण लगेच २ मार्च १६६४ रोजी शिवरायांनी घेतला. याचवेळी सिद्दी जोहरने पन्हाळयास वेढा दिला होता. याचवेळी शिवराय जोहरच्या हातावर तुरी देऊन विशाळगडी राजदिंडीतून गेले. बरोबर शिवा काशीद (प्रति शिवाजी) व बाजीप्रभू होते. तेव्हा मार्गात शिवा काशीद याने प्रति शिवाजी बनून व बाजी प्रभूने घोडखिंड थोपवून धरून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले. पुढे इ. स. १७१० मध्ये पन्हाळा ही कोल्हापूरची राजधानी झाली ती १७७२ पर्यंत येथेच होती. कविवर्य मोरोपंतांचा जन्म येथेच झाला. |