विशाळगड

इथेच पडिला बांध खिंडिला बाजीप्रभुच्या छातीचा
इथेच फुटली छाती, परी ना दिमाख हरला जातीचा ।
आठवण येता अजून येतो, खिंडीचा दाटून गळा ।
विशाळगडाच्या विशाल भाळी, रक्तचंदनी खुले टिळा ।।

 

केशव पंडित आपल्या राजाराम चरितम् काव्यात म्हणतात, `विशाळगडी दुर्गही सांप्रत विद्यते तव । अत्रापि दुर्ग सामग्री परिपूर्णेन भाति मे ।।' यावरूनच गडाचे नाव विशाळगड आहे हे सहज उमगते. पण काही कागदात व शिलालेखास यास खिला खिला, खिला गिला, खेळणा असेही म्हटले आहे. शिवराजांनी या गडास विशाळगड हे नांव दिले.

कोल्हापूर जिल्ह्यात पश्चिम सरहद्दीवर वसलेला हा विशाळगड ! गडाचे अक्षांश रेखांश हे १६-५६ व ७३-४७ असे आहेत. समुद्रसपाटीपासून याची उंची ३३०० फूट आहे. कोल्हापूर ते विशाळगड हे अंतर ८६ कि. मी. आहे. गडावर जाण्यास पूर्वेकडून एक आणि पश्चिमेकडून दुसरी वाट आहे. नावाप्रमाणेच हा गड विशाल आहे. याची लांबी व रूंदी ३२०० * १०४० फूट आहे. येथे वार्षिक पाऊस सरासरी २५० ते ३०० इंच पडतो.