महाबळेश्वर


सातारा जिल्ह्यातील हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहे. ब्रिटीश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट हिलस्टेशन हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून १३७२ मीटर उंचीवर सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या ठिकाणी चांगली घनदाट वनश्री आहे. महाबळेश्वर येथील महाबळेश्वर मंदिर, लागून असलेले जावळीचे खोरे आणि प्रतापगड या सर्व स्थळांना शिवरायांच्या नावाचा व कर्तृत्वाचा ऐतिहासिक संदर्भ आहे.
महाबळेश्वरला पावसाचे प्रमाण खूप असून पावसाळयात हा परिसर जलमय असतो. येथील सदाबहार निसर्गसौंदर्य, खंडाळा-लोणावळा किंवा माथेरान प्रमाणे या ठिकाणी असलेले पॉइंर्टस् खूप आकर्षक आहेत. विल्सन पॉइंर्ट, आर्थर सीट पॉइंर्ट, लॉडनिग पॉइंर्ट हे त्यापैकी प्रसिद्ध डोंगरकडे होत.
महाबळेश्वराच्या मंदिरात कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री आणि वेण्णा या पाच नद्यांचा उगम होतो. सावित्री ही नदी पश्चिमवाहिनी आहे तर बाकीच्या चार नद्या पूर्ववाहिन्या आहेत. वेण्णा तलाव म्हणजे तर पर्यटकांचे मोठे आकर्षण होय. वाघाचं पाणी या नावाचा मोठा जलाशय येथे आहे. येथे वाघ पाणी पिण्यासाठी येतात असा समज आहे.
येथील स्टॅनबेरीज, रासबेरीज, जांभळं, लाल रंगाची मुळे प्रसिद्ध आहेत. महाबळेश्वरचा मध तर खूपच चविष्ट आणि प्रसिद्ध आहे. गुलकंदही येथे मोठ्या प्रमाणावर मिळतो.