महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. भारताच्या पश्चिम-मध्य भागात असलेल्या महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. मुंबई, देशातील सर्वात मोठे शहर, हे महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर आहे. तर नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्र भारताचे अग्रणी राज्य आहे.
स्थापना - १ मे, १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरु आहेत.
भौगोलिक रचना - महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेला स्थित आहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी (homogeneous) आहे व खूप मोठे क्षेत्र (महाराष्ट्र देश) पठारी आहे. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. दख्खनचा पठारी प्रदेश विविध नद्यांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस व अरबी समुद्राला समांतर अशा सह्याद्री पर्वतरांगा (किंवा पश्चिम घाट) आहेत ज्यांची उंची सुमारे २१३४ मी. (अंदाजे ७,००० फूट) आहे. या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात. अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास कोकण म्हणतात. कोकण भागाची रुंदी ५०-८० कि.मी आहे. राज्याच्या उत्तरेस सातपुडा तर पूर्वेस भामरागड-चिरोळी-गायखुरी पर्वतरांगा आहेत. राज्यात मौसमी पाऊस पडतो. महाराष्ट्रातील काळी बेसाल्ट मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे.
महाराष्ट्रातील जिल्हे-
अहमदनगर, अकोला,अमरावती,औरंगाबाद,बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना,कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ