अँड्रॉईड प्रोग्रॅमिंग – भाग ५

अँड्रॉईड प्रोजेक्टचे स्ट्रक्चर सोबतच्या चित्रात दाखविले आहे. त्यात आपल्याला खालील फोल्डर दिसतात.

src फोल्डर - यात अँड्रॉईड प्रोग्रॅमच्या मुख्य जावा फाईल्स असतात.

gen फोल्डर - या फोल्डरमधील r.java फाईल अँड्रॉईड प्रोजेक्ट कंपाईल करताना तयार होते. यात प्रोजेक्टमध्ये वापरलेल्या सर्व माहिती घटकांसाठी विशिष्ट संदर्भ क्रमांक दिलेले असतात व या संदर्भ क्रमांकांचा वापर करून प्रोजेक्ट एक्झिक्यूट होते.

assets फोल्डर - अँड्रॉईड प्रोजेक्टसाठी आवश्यक असणारी माहिती ठेवण्यासाठी हे फोल्डर वापरता येते. मात्र या फोल्डरमधील फाईल अँड्रॉईड प्रोजेक्टच्या अत्यावश्यक फोल्डरमध्ये समाविष्ट नसल्याने या माहितीघटकांसाठी r.java फाईलमध्ये संदर्भ क्रमांक तयार केले जात नाहीत व केवळ स्थानसंदर्भाव्रून माहितीचा वापर केला जातो. साहजिकच assets फोल्डरमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारे सबफोल्डर करून माहिती साठविता येते.

bin फोल्डर - अँड्रॉईड प्रोजेक्ट कंपाईल व एक्झिक्यूट झाल्यानंतर तयार होणारी .apk फाईल या फोल्डरमध्ये ठेवली जाते.

libs फोल्डर - अँड्रॉईडच्या 17th version पासून पुढे अँड्रॉईड प्रोजेक्ट स्ट्रक्चरमध्ये  libs फोल्डर समाविष्ट करण्यात आले आहे. या फोल्डरमध्ये ( कमांडलाईनवरून फ्रोजेक्ट करताना अँट बिल्ड सिस्टीमसाठी लागणार्‍या) JAR फाईल ठेवल्या जातात. कंपाईल करताना या .apk फ़ाईलमध्ये यांचा समावेश केला जातो. 
  
res फोल्डर - अँड्रॉईड प्रोजेक्टसाठी आवश्यक असणारी माहिती ठेवण्यासाठी या अधिकृत फोल्डरचा वापर करण्यात येतो. पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे या फोल्डरमध्ये layout, menu, drawable आणि values ही आवश्यक फोल्डर असतातच शिवाय raw नावाचे कोणतीही इतर माहिती ( टेक्स्ट, ग्राफिक,ऑडिओ वा व्हीडीओ ) ठेवता येते. हे फोल्डर res  या अत्यावश्यक फोल्डर्मध्ये असल्याने यातील माहितीचे r.java फाईलमध्ये संदर्भ क्रमांक नोंदले जातात.

AndroidManifest.xml
वरील मुख्य फोल्डरशिवाय AndroidManifest.xml  नावाची फाईल प्रोजेक्टमध्ये अत्यंत महत्वाची असते. या फाईलमध्ये अँड्रॉईड प्रोजेक्टची सर्व माहिती ( activities, content providers, services & intent receivers ) तसेच किमान व कमाल व्हर्जन, इंटरनेट परमिशन व प्रोजेक्टशी संबंधित इतर उपकरणांविषयी माहिती सविस्तरपणे द्यावी लागते. थोडक्यात सांगायचे तर AndroidManifest.xml ही फाईल म्हणजे अँड्रॉईड प्रोजेक्टमधील सर्व घटकांची जंत्री असते.