वेबसाईट डिझाईन - एक उदयोन्मुख नवा व्यवसाय

आज भारतात मोबाईल हे संदेश वहनाचे सर्वात प्रभावी व लोकप्रिय माध्यम बनले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत व गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, सर्वजण आपल्या दैनंदिन कामासाठी याचा वापर करीत आहेत. यामुळे प्रत्यक्ष भेटण्यासाठी लागणारा प्रवास, वेळ व पैसा यात बचत होऊन कार्यक्षमतेत वाढ झाली आहे. आजच्या युगात टेलिफोन/मोबाईलचे महत्व अनन्यसाधारण असले तरी त्यालाही मागे टाकण्याची किमया नजिकच्या भविष्यकाळात वेबसाईट (संकेतस्थळ) करणार आहे. कारण इंटरनेटवरून माहिती घेताना देणार्‍याशी प्रत्यक्ष संपर्क साधण्याची आवश्यकता नसते. शिवाय वेबसाईटच्या माध्यमातून फोनपेक्षा दृक्‌श्राव्य तसेच लिखित स्वरुपाची माहिती सहजपणे मिळविता येते. आज संगणकाने सर्व क्षेत्रात व घराघरात प्रवेश मिळविला आहे. शब्द, चित्र वा संगीत कोणत्याही प्रकारची माहिती संगणक साठवून ठेवू शकतो. त्यावर पाहिजे ते संस्कार करू शकतो. एखाद्या ऑफिसात अनेक संगणक असल्यास ते एकमेकांना जोडून त्यांचे जाळे वा 'नेट` तयार केलेले असते. त्यामुळे हे संगणक एकमेकांत संवाद साधू शकतात. जगभरातील अशी सर्व जाळी वा नेट एकमेकांशी जोडली की होते 'इंटरनेट`. वेबसाईट वा संकेतस्थळ म्हणजे इंटरनेटच्या जगभर पसरलेल्या आभासी विश्वात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणे होय. आकाशातल्या तार्‍याप्रमाणे जगातील सर्वांना ते पाहता येईल व आपले कार्य, व्यवसाय वा उद्योग यांची माहिती जगात कोणासही घरबसल्या मिळविता येईल. इंटरनेट सर्वदूर पसरल्यानंतर संदेशवहनाचे तसेच इतर सर्व माहितीच्या देवाणघेवाणाचे ते एक सक्षम व कमी खर्चाचे साधन ठरणार आहे. वेबसाईट म्हणजे काय? आपण एखादा लेख किंवा गोष्ट वाचायला घेतली तर त्यातील माहिती एकसंगत क्रमवार असल्याने पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचल्याशिवाय त्यातील आवश्यक माहिती कोठे आहे याचे ज्ञान होत नाही. पुस्तक वा कादंबरीसारख्या मोठ्या लेखनाचे गट करून त्यांना प्रकरण शीर्षके वा दुय्यम शीर्षके देऊन अशी सुविधा देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र संगणकावरील माहितीचा शोध घेताना याला फारच मर्यादा पडतात. एच.टी.एम. एल. या संगणक प्रणालीचा उपयोग केल्यास माहिती कोषातील हवी ती माहिती माऊसच्या एका क्लिकने क्षणात दाखविता येते. यापद्धतीने तयार केलेले पान म्हणजे वेबपेज होय. यावर अनेक महत्वाच्या संदर्भशब्दांना माहिती दर्शक दुवे जोडलेले असतात. अशा एकमेकांना जोडलेल्या अनेक पानांमध्ये सर्व माहिती (लेखन, चित्रे, ध्वनी, चलत्‌चित्रे इत्यादी) समाविष्ट केल्यावर तयार झालेल्या संचास वेबसाईट असे म्हणतात. ही वेबसाईट ज्या संगणकावर स्थापित केली जाते त्याला सर्व्हर असे म्हणतात. सर्व्हर संगणक धूळविरहित अशा जागेत कमी तापमानाला ठेऊन त्यातील माहितीचे केबल व डिशच्या माध्यमातून सॅटेलाईटद्वारे प्रक्षेपण केले जाते. जगभरातील कोणत्याही संगणकाला (क्लायंट) ही माहिती टेलिफोन यंत्रणेचा उपयोग करून ग्रहण करता येते. ही माहिती संगणकावर दिसण्यासाठी विशिष्ट संगणक प्रणालीचा वापर करावा लागतो. त्याला ब्राऊजर असे म्हणतात. इंटरनॆट एक्स्प्लोअरर, मोझिला फायरफॉक्स असे अनेक ब्राऊजर वापरता येतात. वेबसाईटचे नाव सोपे व सहज लक्षात ठेवता येईल असे असावे लागते. गुगल, याहू इत्यादी शोधयंत्रांना ती चटकन सापडेल व शोधयादीत ती वरच्या क्रमांकावर यावी यासाठी वेबसाईट डिझाईन करताना व त्यातील माहिती मांडताना विशेष काळजी घ्यावी लागते. वेबसाईटचा उपयोग माहिती देण्याबरोबर आपल्या मालाची वा व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी केला जात असल्याने अशी वेबसाईट पाहणार्‍याचे लक्ष वेधून घेईल अशा आकर्षक स्वरूपाची असावी लागते. शिवाय सर्व प्रकारच्या ब्राऊजरवर ती व्यवस्थित दिसावी अशी काळजी घ्यावी लागते. वेब डिझाईनचे तंत्रज्ञान आता फार विकसित झाले आहे. त्यात एचटीएमएल, सीएसएस, फोटोशॉप वापरून साध्या वेबसाईट तयार करण्यापासून ते डाटाबेस वापरून त्वरित प्रतिसाद व संस्कारित योग्य माहिती देणार्‍या, तसेच फ्लॅश, फ्लेक्स सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या, कार्यक्षमतेत परिपूर्ण व आकर्षक वेबसाईट करण्यापर्यंत अनेक पायर्‍या आहेत. सुदैवाने वेबडिझाईनसाठी अनेक नाविन्यपूर्ण संगणक प्रणाली व सुविधा उपलब्ध आहेत. साध्या नोटपॅडचा वापर करून वेबसाईट बनविता येणे शक्य असले तरी फ्रंटपेज, ड्रीमवीव्हर वा व्हिज्युअल इंटरडेव्ह चा वापर करणे अधिक सोपे असते. चित्रे व फोटो यांचा वापर करताना फोटोशॉप वा फायरवर्क्स सारख्या प्रणालींचा वापर करून त्यांच्यावर वेबसाठी सुयोग्य संस्कार करणे आवश्यक असते. ध्वनी व चलत्‌ चित्रांसाठी फ्लॅश व फ्लेक्स तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो. तर त्रिमितीदर्शक चित्रे व चित्रफीत बनविताना थ्रीडीमॅक्सचा उपयोग करावा लागतो. माहितीची मांडणी आकर्षक व एकसमान असावी यासाठी सीएसएस प्रणालीचा वापर केला जातो. डाटाबेसमध्ये माहितीचे संकलन केले असल्यास ए एस पी , पी एच पी किंवा जावा या संगणक भाषाप्रणालींचा उपयोग करून वेबपेजचे डिझाईन करावे लागते. वर्डप्रेस, जुमला, द्रुपल नावाच्या अतिशय प्रगत प्रणालींचा वापर केल्यास वेब डिझाईन अधिक जलद करता येते. या सर्व प्रणालींचा सखोल अभ्यास व वापराचा सराव या दोन्ही गोष्टींची गरज वेब डिझाईन उद्योगासाठी आवश्यक आहे. दुर्दैवाने वेबडिझाईनच्या तंत्रज्ञानातील फारच थोडी माहिती प्रचलित संगणक अभ्यासक्रमात असल्याने संगणक विषयात मास्टर्स वा अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही वेब डिझाईन करणे अवघड जाते. वेबसाईटची गरज व मागणी अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात आज फोनपेक्षा इंटरनेटचा जास्त वापर करण्यात येतो. ऑफिसला जाताना कोणत्या रस्त्यावर गर्दी कमी आहे वा प्रदूषण नाही हे पाहण्यासाठी वेबसाईटचा वापर केला जातो. दुकानात जाण्यापूर्वी घ्यायच्या वस्तू कोणत्या दुकानात काय किमतीला आहेत हे पाहता येते. अगदी केशकर्तनालयापासून ते पर्यटनसेवेपर्यंत व किरकोळ दुकानदारापासून ते कार विकणार्‍या संस्थांपर्यंत सर्वांच्या वेबसाईट असतात. शिक्षण, आरोग्य, शासकीय सेवा यांची माहिती देखील वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध असते. त्यामुळे वेबसाईटचा वापर ही तेथील नागरिकांची नित्याची व गरजेची बाब ठरलेली आहे. भारतात इंटरनेटचा वापर सध्या फारच मर्यादित असला तरी त्यात आता विलक्षण गतीने वाढ होत आहे. शासनाने इ-गव्हर्नन्स पद्धतीचा वापर करून प्रशासनात कार्यक्षमता व गतीमानता आणण्याची योजना आखली आहे. शिक्षण क्षेत्रात प्रवेश व परीक्षा यासाठी वेबसाईटचा वापर सुरू झाला आहे. एसटी, रेल्वे, विमान प्रवासाचे आरक्षण आता वेबसाईटवरून करता येते. जनगणना व माहिती प्रसारण व संकलन यासाठी वेबसाईटचा वापर अनिवार्य झाला आहे. भारतात अनेक भाषा बोलल्या जात असल्याने व इंग्रजी समजणार्‍यांचे प्रमाण अल्प असल्याने प्रादेशिक भाषांत वेबसाईट करण्याचे तसेच सर्व शहरे व गावांतील नागरिकांच्या दैनंदिन कामासाठी त्या गावांच्या स्वतंत्र वेबसाईट तयार करण्याचे फार मोठे कार्य नजिकच्या काळात करावे लागणार आहे.\ इंटरनेटच्या वाढत्या प्रसाराबरोबर अनेक परदेशी कंपन्या वेबसाईटच्या माध्यमातून येथील बाजारपेठ काबीज करीत आहेत. जागतिकीकरणाच्या या लाटेचा चीन, सिंगापूर, कोरिया या देशांनी फायदा घेतला असून आपला माल येथील ग्राहकांना विकण्यात ते यशस्वी झाले आहेत व त्याचा येथील उद्योगांवर विपरीत परिणाम होत आहे. घरोघरी ब्रॉडबँड पोहोचल्यावर आणि मोबाईलवर इंटरनेटसेवा सुरू झाल्यावर तर हा धोका अधिकच वाढणार आहे. त्यांच्यावर बंधने घालून हा प्रश्न सुटणार नाही. तर येथील उद्योगांनीही इंटरनेटच्या माध्यमातून आपली जाहिरात केवळ येथील ग्राहकांसाटी नव्हे तर जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले पाहिजेत. येथील उद्योगांनी आपल्या व्यवसायाची / उद्योगाची वेबसाईट तयार केल्यास परदेशी कंपन्यांच्या येथील आक्रमणास यशस्वीपणे तोंड देऊ शकतील. एवढेच नव्हे तर आपल्या मालाची परदेशात निर्यात करू शकतील. रंगीत आकर्षक माहिती पत्रके, दरपत्रक वा मॅन्युअल छापण्यास व ती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यास बराच खर्च येतो. ही सर्व माहिती आपल्या वेबसाईटवर ठेवल्यास कोणासही व कोठेही पाहता येते वा छापून घेता येते. यामुळे छपाईचा वा पोस्टेजचा खर्च वाचतो. याशिवाय वेबसाईटवर फोटो, ध्वनी वा चित्रफिती अथवा संदर्भ साहित्य ठेवता येत असल्याने ग्राहकास उद्योग, उत्पादन व सेवा यांचे प्रत्यक्ष भेटीसारखे सर्वार्थाने ज्ञान होऊ शकते. वेबसाईटवरूनच संपर्क साधण्याची व अधिक माहिती, शंका वा मागणी नोंदविण्याची सोय असल्याने ग्राहकास ते फार सोयीचे ठरते. क्रेडिट कार्डसारखी व्यवस्था असल्यास वेबसाईटवरूनच जागतिक स्तरावर खरेदी विक्रीचे व्यवहार होऊ शकतात. इंजिनिअरिंग वा बांधकामविषयक उद्योगात मोठी ड्राइंग पाठवावी लागतात. नेहमीच्या इमेलने ती पाठविता येत नाहीत. साध्या वेबसाईटवरूनही ती लवकर घेता येत नाहीत. अशावेळी वेबसाईटवर आवश्यक तेवढी जागा ठेवून अशी व्यवस्था करता येते. याविषयीची जागृती उद्योजक व व्यावसायिकांत होऊ लागल्याने वेब डिझाईन करण्याच्या व्यवसायास चांगली मागणी येऊ लागली आहे. वेबसाईट डिझाईन करण्याचा व्यवसाय कॉर्पोरेट क्षेत्राला सध्यस्थितीत मोठ्या मनुष्यबळाची गरज आहे. चांगल्या वेब डिझाईनरसाठी २० हजार ते ५० हजार रुपये दर महिना पगार देण्याची या कंपन्यांची तयारी असते. मुंबई, पुणे, हैदाबाद, बंगळूरू, अहमदाबाद यासारख्या मोठ्या शहरांप्रमाणेच आज सांगली, कोल्हापूर यासारख्या शहरातही संगणक प्रशिक्षणाचं दालन खुलं झालं आहे. या भागातील सर्वच विद्यार्थ्यांना मोठ्या शहरात जावून शिक्षण घेणं शक्य होत नाही. सुदैवाने वेबसाईट डिझाईन शिकविणार्‍या अनेक नामवंत संस्था सांगलीमध्येही कार्यरत असून तेथे मल्टिमिडिया तंत्रज्ञानाचं उत्कृष्ट प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळू शकते. आस्की कॉम्प्युटर्स ही संस्था अशा संगणक प्रशिक्षणाच्या क्षेत्रात अग्रेसर आहे. जानदीप इन्फोटेक प्रा. लि. ही वेब डिझाईन कंपनी गेली दहा वर्षे या क्षेत्रात काम करीत असून आजपर्यंत या संस्थेने सुमारे दीडशे वेबसाईट तयार केल्या आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांत दर्जेदार वेबसाईट विकसित करून संस्थेने आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचे स्थान मिळविले आहे. येथे २/३ वर्षे काम करून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई, बंगलोर येथे मोठ्या पगाराच्या नोकर्‍या लागल्या आहेत. परदेशातील वेब डिझाईनविषयक कामेही आता ही संस्था करीत असून आस्की कॉम्प्युटर्सच्या सहकार्याने एका मोठ्या प्रोजेक्टवर सध्या काम चालू आहे. वेब डिझाईनसाठी कोणत्याही पूर्व शिक्षणाची अट नाही. ज्याला गणित, विज्ञान व चित्रकला या विषयात आवड असेल त्याला तीन ते सहा महिन्याच्या कालावधीत साध्या वेबसाईट डिझाईन करण्यात पारंगत होता येते. मात्र अधिक विकसित व आकर्षक वेबडिझाईनचे शिक्षण घेण्यासाठी दीड ते दोन वर्षे पूर्ण वेळ चिकाटीने अभ्यास करावा लागतो. ज्ञानदीप एज्युकेशन अँड रिसर्च फौंडेशनने गरीब पण हुषार विद्यार्थ्यांसाठी असे शिक्षण देण्याची योजना आखली आहे. या व्यवसायात रस असणार्‍या व एवढा काळ पूर्ण वेळ शिकण्याची तयारी असणार्‍या गरजू विद्यार्थ्यांनी ज्ञानदीप एज्युकेशन अँड रिसर्च फौंडेशनशी (This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.) याबाबतीत संपर्क साधावा.