सामाजिक संस्थांसाठी प्रभावी संपर्क माध्यम - वेबसाईट

शिक्षण, समाजसेवा, सांस्कृतिक कार्य, राजकारण, कला व क्रीडा अशा क्षेत्रात अनेक सामाजिक संस्था कार्य करीत असतात. अशा संस्थांकडून आपल्या सभासदांशी संपर्क ठेवण्यासाठी व कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी फोन करणे, पत्रे पाठविणे, छापील पत्रके वाटणे, वर्तमानपत्रात जाहिरात देणे वा बॅनर लावणे या पद्धतींचा वापर केला जातो. त्यासाठी पुष्कळदा स्वतंत्र ऑफिस स्टाफ नेमलेला असतो त्यांच्या पगारासाठी, पोस्टेजसाठी, फोन, छपाई व जाहिरात यासाठी खर्चही बराच येतो. सभासदांच्या वर्गणीचा बराचसा हिस्सा या बाबींवरच खर्च होतो. त्यामुळे संस्थेच्या मुख्य कार्यासाठी पैसा अपुरा पडतो व वेळही बराच जातो. आता या सर्व कामांसाठी वेबसाईट हे अत्यंत प्रभावी व कमी खर्चाचे माध्यम उपलब्ध झाले आहे. वेबसाईटमुळे केवळ संपर्काचेच काम होत नाही तर संस्थेविषयी सर्व माहिती, कार्यक्रमांचे फोटो सर्वांना उपलब्ध होतात. नवे सभासद मिळण्यास याची मदत होते. ज्ञानदीपने खालील संस्थांच्या वेबसाईट डिझाईन केल्या आहेत त्यांचे अनुभव याबाबतीत पुरेसे बोलके आहेत.
  • मधुरंग वधुवर सूचक मंडळाची मराठी माध्यमातील वेबसाईट स्थानिक व इंटररनेटवर कार्य करू शकेल अशा सॉफ्टवेअरवर आधारित असून त्याचे डिझाईन पाच वर्षांपूर्वीच ज्ञानदीपने केले आहे. या वेबसाईटद्वारे सर्व जातीधर्माच्या लोकांना वधुवर निवडीविषयी माहिती पुरविते. आजही त्या वेबसाईटचा उपयोग करुन नावे नोंदविणारांची संख्या मोठी आहे.
  • सांगलीतील नूतन बुद्धीबळ मंडळ दरवर्षी बुद्धीबळाच्या अनेक स्पर्धा भरविते. भारतातील सर्व ठिकाणचे हौशी बुद्धीबळपटु यात भाग घेतात. या स्पर्धांची माहिती देण्यासाठी त्याना वेबसाईटचा फार उपयोग होतो.
  • मुंबईच्या इंडियन वाटर वर्क्स असोसिएशनचे भारतातील सर्व राज्यात ५००० पेक्षा जास्त सभासद आहेत. त्यांच्यातर्फे दर तिमाहीला एक टेक्निकल जर्नल प्रसिद्ध केले जाते. तरी दरवर्षी होणार्‍या राष्ट्रीय संमेलनाची माहिती व विविध विभागात होणार्‍या कार्यक्रमांचे वृत्त देण्यासाठी वेबसाईटचा वापर केला जातो.
  • बंगलोरच्या महाराष्ट्र मंडळास आपली वेबसाईट मराठीत हवी होती. ज्ञानदीपने तशी वेबसाईट त्यांना करून दिली. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अग्रेसर असणार्‍या व बहुतेक सदस्य या क्षेत्रातील तज्ज्ञ इंजिनिअर असणार्‍या संस्थेची वेबसाईट करणे तसे धाडसाचेच काम होते. सुदैवाने माझा मुलगा व सून त्यावेळी बंगलोरमध्ये वास्तव्यास होते. त्यांनी तयार केलेली वेबसाईट त्यांना आवडली. प्रसिद्ध साहित्यिक अरूण साधू यांच्या हस्ते करण्यात आले. मराठी श्री लिपी फॉंट वापरून केलेल्या त्या वेबसाईटचे रुपांतर आता युनिकोड फॉंट व आधुनिक सीएमएस टेक्नॉलॉजी वापरून केले आहे. यात नवी माहिती भरण्याचे काम संस्थेस स्वतः करता येते.
  • सांगलीचे वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज १९४७ साली स्थापन झाले. या कॉलेजचे माजी विद्यार्थी आज भारतात व जगातील अनेक देशात महत्वाच्या हुद्द्यांवर काम करीत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत कॉलेजच्या सद्यस्थितीची माहिती पोहोचविण्यासाठी माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेची वेबसाईट ज्ञानदीपने गेली अनेक वर्षे चालविली आहे. यात माजी विद्यार्थ्यांना आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांची माहिती मिळू शकते. नवा सभासद म्हणून नोंदणी करता येते. माजी विद्यार्थ्यांचा डाटाबेस व आधुनिक सीएमएस यांचा वापर येथे केला असून फोटोगॅलरीसाठी फ्लॅश टेक्नॉलॉजी वापरली आहे.या वेबसाईटचे चित्र पूर्वीच्या लेखात दाखविले आहे.
मिरज एज्युकेशन समिती, वुईमेन्स एज्युकेशन सोसायटी, लट्ठे एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी या संस्थांच्या वेबसाईट ज्ञानदीपने डिझाईन केल्या आहेत. या संस्थांच्या कार्याची माहिती व कार्यक्रमांच्या सूचना सर्व घटक संस्था व कार्यकारी मंडळास पाठविण्याचे कार्य या वेबसाईटमुळे कमी खर्चात होतेच. शिवाय जनतेला संस्थेच्या कार्याची माहिती कळते.