बांधकाम व्यवसायात वेबसाईटचे महत्व
Category: वेबसाईट डिझाईन
वाढत्या शहरीकरणामुळे बांधकाम व्यवसायाला भरभराटीचे दिवस आले आहेत. पुण्यामुंबईसारख्या मोठ्या शहरांपासून नगर बारामतीसारख्या छोट्या शहरांपर्यंत, सर्वत्र नवी गृहसंकुले (रेसिडेन्शियल अपार्टमेंटस) उभी रहात आहेत. नोकरदारांचे पगार वाढल्याने व बॅंकांकड्न कर्ज मिळणे सुलभ झाल्याने अनेक लोक गरज म्हणून वा गुंतवणूक म्हणून नव्या फ्लॅटसाठी पैसे गुंतवीत आहेत. सुयोग्य फ्लॅटचा शोध घेण्याचे काम मात्र दिवसेंदिवस बिकट होत आहे. अपार्टमेंटच्या जागा गावापासून दूर व एकमेकांपासून फार अंतरावर असल्याने एजंटच्या मदतीने प्रत्यक्ष भेट देऊन फ्लॅटची निवड करण्यात फार वेळ जातो.
परगावच्या लोकांना तर ते अतिशय त्रासाचे काम असते. अशावेळी कोणाच्या ओळखीतून वा बिल्डरच्या कॅटलॉगमधील वा जाहिरातीतील फोटो पाहून फ्लॅटची निवड केली जाते. यात फसगत होण्याची वा दुसरा अधिक चांगला व किफायतशीर पर्याय उपलब्ध असूनही केवळ माहिती न कळल्याने योग्य निवड करण्याची संधी गमावली जाते. बिल्डर वा अपार्टमेंट मालकांना देखील संभाव्य ग्राहका्पर्यंत आपल्या अपार्टमेटविषयी सविस्तर माहिती व फोटो पोहोचविणे अवघड जाते व कॅटलॉग छापणे पार खर्चाचे काम असते. अशा कॅटलॉगद्वारे माहिती देण्यासही मर्यादा पडतात व ग्राहकाला प्रत्यक्ष अपार्टमेंट पाहण्याची संधी मिळत नाही.
सुदैवाने वेबसाईटद्वारे अशी सर्व माहिती जनतेसाठी उपलब्ध करून देता येते. आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून नकाशे, फोटो, व्हीडिओ गॅलरी यांचा समावेश अशा वेबसाईटमध्ये करता येतो. 3D walkthrough व एनिमेशनच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटीचा अनुभव ग्राहकास देता येतो. व्हिडीओ गॅलरी वा 3D एनिमेशनमध्ये तयार केलेली चित्रफीत दिसते. मात्र ग्राहकाला आपल्या मर्जीनुसार विविध भागांचे निरीक्षण करता येत नाही. यावर उपाय म्हणून अडोब कंपनीने वेबसाईटवर वापरता येण्याजोग्या फ्लॅश/फ्लेक्स तंत्र ज्ञानावर आधारित नव्या सुविधेचा विकास केला आहे. यासाठी FMS सर्व्हर वापरावा लागतो. या सुविधेत आपल्याला आपल्या इच्छेनुसार अपार्टमेंट वा बिल्डींगचे निरनिराळ्या दिशानी व कमीजास्त अंतरावरून निरीक्षण करता येते. यामुळे बांधकाम क्षेत्राला एक नवे प्रभावी प्रसारमाध्यम उपलब्ध झाले आहे. अर्थात या नव्या सुविधेनुसार बिल्डींग वा अपार्टमेंटचा फ़्लेक्स प्रोग्रॅम करण्याचे तंत्र फारच थोड्या लोकांना माहीत आहे. सुदैवाने ज्ञानदीपमधील वेब डिझाईनर्सनी हे कौशल्य प्राप्त करून घेतले आहे.
ज्ञानदीपने फ्लॅश तंत्रज्ञानाचा वापर सर्वप्रथम सांगलीतील खरे ग्रुप हौसिंग या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या वेबसाईटमध्ये केला होता. ग्राहकाच्या इच्छेनुसार अपार्टमेंट निवडून पाहण्याजोगे नकाशे व फोटोगॅलरी यांचा त्यात समावेश होता. दुर्दैवाने वेबसाईट कोणी पहात नाही व त्याचा काही उपयोग नाही या कल्पनेने ती वेबसाईट नवी माहिती घालून अद्ययावत ठेवण्याचे वा प्रत्येक जाहिरातीत त्याचा उल्लेख करण्याचे काम अपार्टमेंट मालकांकडून केले गेले नाही व ती वेबसाईट बंद करण्यात आली. अर्थात त्यावेळी म्हणजे चार वर्षांपूर्वी इंटरनेटची कनेक्शन फार थोड्या लोकांकडे होती. वेबसाईटविषयी तर फारशी माहिती कोणालाच नव्हती. त्यामुळे आमचे प्रयत्न वाया गेले. मात्र त्या निमित्ताने फ्लॅशच्या नवनव्या संशोधनाचा अभ्यास ज्ञानदीपमध्ये सुरू झाला. परदेशातून व चेन्नईहून अशा कामाची मागणी आली व त्या अनुभवाचे चीज झाले.
खाली खरे ग्रुप वेबसाईटची चित्रे दाखविली आहेत. त्यातील फ्लॅश एनिमेशन या ब्लॉग मध्ये दाखविता येत नाहीत.
यानंतर पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाची वेबसाईट करण्याचे काम मिळाले. त्याचे चित्र खाली दिले आहे.
मात्र या वेबसाईटविषयी माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतात. आपल्या व्हिजिटींग कार्ड, लेटरहेड व इतर प्रसिद्धीपत्रकात त्याचा ठळकपणे उल्लेख करावयास हवा. या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्याने वेबसाईटचा अपेक्षित फायदा व्यावसायिकास मिळाला नाही व वेबसाईटही बंद करण्यात आली. यावरून आमच्या हे लक्षात आले की वेबसाईट करू इच्छिणार्या व्यक्तीला वेबसाईट मार्केटींगचे ज्ञान देणे आवश्यक आहे. बांधकाम क्षेत्रातील सांगलीच्या इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट्स या संस्थेची वेबसाईट डिझाईन केली.(खाली चित्र पहा) या वेबसाईटमुळे सांगलीतील आर्किटेक्ट्सना वेबसाईटच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधता येईल, कार्यक्रमांची सूचना देता येईल व बांधकाम वस्तू विक्रेत्यांच्या जाहिरातींद्वारे या वेबसाईटच्या खर्चाचा बोजा संस्थेवर पडणार नाही असे वाटले होते. तरी मोबाईलद्वारे संपर्क करण्याची सवय झाल्याने या वेबसाईटचा वापर करण्यात कोणी फारसा रस दाखविला नाही. परदेशात रीअल इस्टेटच्या व्यवसायासाठी वेबसाईट हेच माध्यम मुख्यत्वे वापरले जाते त्याचा उपयोग ग्राहकांना घर निवडीपासून कर्जपुरवठा, सामान वाहतूक, अंतर्गत सजावट व इतर सर्व सेवा देण्यासाठी करण्यात येतो. या माध्यमाचा भारतात मोठ्या प्रमाणावर होण्याची आवश्यकता आहे. मात्र त्यासाठी वेबसाईटचे ज्ञान इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट्सनी आत्मसात करण्याची गरज आहे.