ग्रामविकासासाठी वेबसाईट
Category: वेबसाईट डिझाईन
महाराष्ट्रातील अनेक गावात ग्रामविकासाची चांगली कामे झाली आहेत. रोजगार हमी योजना, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, निर्मल ग्राम योजना, सर्व शिक्षा अभियान अशा अनेक राज्य वा केंद्रशासनाच्या योजनांचा फायदा घेऊन आपल्या गावाची सर्वांगीण प्रगती करण्याचा प्रयत्न प्रत्येक गावातील पंचायत समिती करीत आहे. तरीही अशी प्रगती न झालेल्या गावांची संख्याही खूप आहे. याची कारणे पुष्कळदा योजनांची माहिती नीट न कळणे, गावकर्यांकडून आवश्यक तेवढा निधी गोळा न होणे व ग्रामविकासात अग्रेसर असणार्या गावांचा अनुभव सर्वांपर्यंत न पोहोचणे ही असू शकतात.
माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे वेबसाईटचे नवे प्रसारमाध्यम वापरून वरील सर्व अडचणींवर मात करणे आता शक्य झाले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव जागतिक नकाशावर आणून तेथील योजनांसाठी व ग्रामविकासासाठी सर्वतोप्रकारची मदत मिळविण्यासाठी वेबसाईट हे प्रभावी व अत्यंत कमी खर्चाचे साधन ठरणार आहे.
आज गावोगाव पुढार्यांच्या वाढदिवसांसाठी शुभेच्छाचे मॊठमोठे बॅनर झळकत असतात. या बॅनरला येणारा खर्च गावातील उत्साही कार्यकर्ते करीत असतात. या बॅनरच्या खर्चापेक्षाही कमी खर्चात गावाची सर्व माहिती वेबसाईटच्या माध्यमातून आपण जगाच्या कानाकोपर्यात पोहोचवू शकतो. त्या गावात जन्मलेले पण सध्या परगावी वा परदेशात मोठ्या हुद्द्यांवर काम करीत असणारे वा उद्योग /व्यापारात यशस्वी झालेले लोक आपल्या जन्मगावासाठी मदत करण्यास इच्छुक असतात. त्यांच्यापर्यंत गावाची माहिती पोहोचविण्याचे कार्य वेबसाईटमुळे घडते व स्थानिक पुढार्यांवर विकासासाठी न अवलंबून राहता गावाला अशा लोकांकडून अर्थ साहाय्य मिळविता येते. स्थानिक भागाचा विचार केला तरी गावातील दुकानदार व व्यापारी यांच्या जाहिराती घेऊन गावाची वेबसाईट सुरू करणे सहज शक्य आहे.
गावाच्या वेबसाईटवर खालील माहितीचा समावेश करता येईल.
१. गावाचा नकाशा,
२. जिल्हा व तालुक्यातील स्थानदर्शक नकाशा
३. गावाची भौगोलिक व पर्यावरणविषयक माहिती
४. एस.टी. व रेल्वे वेळापत्रक
५. पंचायत समिती सदस्यांची नावे व फोटो
५. गावाचा इतिहास व प्रसिद्ध व्यक्तींची ओळख
६. महत्वाचे फोन नंबर
७. ग्रामपंचायत, देऊळ, समाजमंदिर, शाळा व इतर प्रेक्षणीय स्थळांचे फोटो
८. गावाचा विविध योजनांतील सहभाग
९. भविष्यकालीन विकास योजना व खर्चाचा अंदाज
१०. संपर्क
११. बातम्या व माहितीकक्ष
१२. जाहिराती - जाहिरातींच्या माध्यमातून गावाच्या वेबसाईटचा खर्च सहज भागू शकेल.
अशी वेबसाईट युनिकोड मराठी वापरून केली तर गुगलसारख्या शोध यंत्रावर केवळ गावाच्या नावावरून कोणासही शोधता येईल. गावाने केलेल्या विकासकामांची माहिती सर्व जगभर जाउ शकेल. परगावचे लोक गावाशी संपर्क साधू शकतील गावातील मुलांना नोकरी लागण्यासाठीही याचा उपयोग होईल. शाळेत वा ग्रामपंचायतीत असनार्या कॉम्प्युटरचा चांगला उपयोग होईल.याशिवाय ग्रामस्थांना या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होईल व सर्व माहिती कळू शकेल.
ज्ञानदीप फौंडेशनने अशीच एक वेबसाईट सांगली शहरासाठी केली आहे त्याची काही चित्रे खाली दिली आहेत.


