वेबसाईटची पूर्वतयारी
Category: वेबसाईट डिझाईन
वेबसाईट तयार करण्याची कला अवगत करून घेतली तरी वेबसाईटवर काय माहिती व कोणत्या स्वरुपात घालायची याची पूर्वतयारी नसेल तर वेबसाईटचे काम पूर्ण होण्यात विलंब लागतो. बर्याच वेळा वेबसाईट डिझाईनचे काम देणार्या ग्राहकाला याची काहीच माहिती नसते. शिवाय प्रत्येक क्षेत्रातील वेबसाईटसाठी वेगवेगळ्या प्रकारची माहिती संकलित करावी लागते. अशी माहिती अद्ययावत व अधिकृत असावी लागते.
एकूणच वेबसाईट हे प्रसिद्धी माध्यम लोकांना फारसे परिचयाचे नसल्याने अशा माहिती संकलनातच बराच वेळ जातो. वेबसाईटचे डिझाईन करणार्या संस्थेने ग्राहकास याबाबतीत मार्गदर्शन करणे गरजेचे असते. ग्राहकाच्या वेबसाईटपासूनच्या अपेक्षा विचारात घेऊन त्यास समर्पक अशी कोणती माहिती वेबसाईटवर घालणे योग्य ठरेल. त्यासाठी कोणत्या प्रकारची ( स्टॅटिक वा डायनॅमिक) वेबसाईट आवश्यक आहे त्यावर काय विशेष सुविधा देणे फायदेशीर ठरेल, त्यासाठी किती खर्च येईल व दरवर्षी लागणार्या माहितीतील फेरबदलासाठी कोणती पद्धत अवलंबावी याविषयी सविस्तर माहिती ग्राहकास दिल्यानंतरच वेब डिझाईनचे काम सुरू करणे श्रेयस्कर ठरते. अन्यथा वेबसाईट तयार झाल्यानंतरही ग्राहकास त्यापासून अपेक्षित लाभ होत नाही. त्याची निराशा होते व वेबसाईट सतत नव्या माहितीने ताजी ठेवण्याकडे दुर्लक्ष होते व कालांतराने अशा वेबसाईट बंद पडतात.
ग्राहकाचे असे प्रबोधन करण्यासाठी वेब डिझाईन करणार्या संस्थेने ग्राहकाच्या उद्योग / व्यवसायाचा अभ्यास करुन वेबसाईटवर प्रसिद्ध करावयाच्या माहितीचा कच्चा आराखडा करणे, ग्राहकाच्या इतर स्पर्धकांच्या वेबसाईटविषयी माहिती जमा करणे व ग्राहकाला वेबसाईटच्या संभाव्य प्रभावाविषयी कल्पना देणे आवश्यक असते. वेबसाईट डिझाईन करणारी संस्था अनुभवी असेल तर तिच्याकडे अशी माहिती नियमितपणे संकलित केली जात असते. वेबसाइट डिझाईनचे अद्ययावत तंत्रज्ञान व समर्पक माहिती यांचा कुशलतेने वापर केल्यास ग्राहकास या वेबसाईटचा फायदा होतो व अशी यशस्वी वेबसाईट ग्राहक तसेच डिझाईन करणारी संस्था दोघांनाही लाभदायक ठरते.
ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. ह्या आमच्या संस्थेने गेल्या दहा वर्षात अनेक वेबसाईट तयार केल्या. सुरुवातीच्या काळात ग्राहकाच्या इच्छेनुसार वेबसाईट बनविल्या तरी त्या फारश्या यशस्वी झाल्या नाहीत. याचे मुख्य कारण ग्राहकासच याविषयी असणारी अपुरी माहिती आहे हे लक्षात आल्यानंतर वेबसाईटच्या डिझाईनसाठी स्वतंत्रपणे अभ्यास करुन ग्राहकापुढे योग्य पर्याय विचारासाठी ठेवण्याची पद्धत अवलंबण्यात आली. मात्र त्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील वैशिष्ठ्यांचा अभ्यास व वेब डिझाईन क्षेत्रात होणार्या प्रगतीचा अंगिकार अशा दोन्ही आघाड्यांवर प्रयत्न करावे लागले. अशा संशोधनात वेळ गेल्याने आर्थिक लाभ झाला नाही तरी वेबडिझाईनच्या क्षेत्रात सतत नवे प्रयोग करणारी संस्था असा नावलौकीक प्राप्त झाला. वेबसाईटचे अद्ययावत तंत्रज्ञान शिकलेल्या आमच्या बर्याच कर्मचार्यांना पुण्या-मुंबईतील मोठ्या पगाराच्या नोकर्या मिळाल्या. पण काही ध्येयवेडया व्यक्तीनी अशा संधीकडे पाठ फिरवून ज्ञानदीपची परंपरा कायम राखली एवढेच नव्हे तर परदेशातील कामे मिळवून यशस्वी करून दाखविली.
स्थानिक पातळीवर मात्र वेब डिझाईनबद्दल पुरेशी जागृती निर्माण करण्यात आम्ही अयशस्वी ठरलो. उद्योग व व्यवसाय करणार्या लोकांच्या वयोगटाला वेबसाईट हे नवे माध्यम अजूनही नवखेच वाटत आहे. शासन, बॅंका, शिक्षणसंस्था वा अन्य संस्थांच्या ऑनलाईन कार्यपद्धतीमुळे नाईलाजाने वेबसाईट करावी लागणारे लोक अधिक आहेत. साहजिकच एखाद्या प्रसिद्धीपत्रकाइतकीच वा त्याहूनही कमी उपयुक्तता वाटून नावापुरती, कमीतकमी खर्चाची वेबसाईट करण्याकडे त्यांचा कल असतो. आम्ही सादर केलेले पर्याय त्यांना पटत नाहीत. त्यांच्या इच्छेनुसार केलेली वेबसाईट कार्यक्षमतेत तोकडी पडते व त्यांच्या पूर्वग्रहाला आणखीनच बळकटी येते.
त्यांना वेबसाईटच्या प्रभावी माध्यमाविषयी माहिती देणे व त्यांना जागतिक स्पर्धेसाठी सक्षम करणे अशी महत्वाची कामे आमच्यासारख्या वेबडिझाईन संस्थांना करावी लागणार आहेत. वेबसाईट जनजागृतीचा उद्देश हाच आहे.