शोधयंत्रास सुयोग्य (SEO) वेबसाईट भाग - ५
Category: वेबसाईट डिझाईन
Off-Page SEO Strategies
बाहेरून लिंक मिळण्यासाठी वेबसाईटमधील माहिती उत्तम दर्जाची व अद्ययावत असणे आवश्यक आहे.
१. नेमकेपणा -
समजा तुम्हाला एखादी वस्तू विकावयाची असेल तर तिची मुख्य वैशिष्ठ्ये कोणती? बाजारात उपलब्ध असणार्या इतर उत्पादकांच्या वस्तूंपेक्षा त्यात काय वेगळेपण आहे. त्यांच्याशी तुलना करून आपल्या वस्तूची निवड करणे कसे योग्य आहे हे पटवून देणारी माहिती त्यात हवी. सेवा वा व्यवसाय याबाबतीतही आपले वेगळेपण स्पष्ट करणारी माहिती वेबसाईटवर हवी. असे असेल तर साहजिकच आपल्या वेबसाईटला बाहेरच्या लिंक मिळतील. जास्त लोक वेबसाईटला भेट देतील व भेटीचे रुपांतर प्रत्यक्ष व्यवहारात होईल.
२. उद्दिष्टे -
आपल्या वेबसाईटचे उद्दिष्ट शिक्षण, करमणूक, प्रसिद्धी का व्यवसाय यापैकी नेमके काय आहे याचा विचार करा. तुमचा ग्राहक वर्ग कोणता आहे. नवीन लोकांनी तुमची वेबसाईट पहावी यासाठी त्यात काय माहिती असणे आवश्यक आहे व जुन्यांनी तिला सतत भेट द्यावी यासाठी त्यात किती बदल वा नूतनीकरण होणे आवश्यक आहे याचा शोध घ्या.
३. मार्केट रिसर्च -
ग्राहकांच्या आवडी निवडी, त्यात होणारे संभाव्य बदल, प्रतिस्पर्ध्यांच्या वेबसाईट, त्यांचा ग्राहकवर्ग, वेबडिझाईन टेक्नॉलॉजीतील आधुनिक पर्याय याबाबत सखोल संशोधन करून वेबडिझाईनची रूपरेखा व माहितीचे नियोजन करा. नव्या बातम्या, पर्याय, अडचणी व किंमतीच्या तुलना तसेच पुरवणी माहिती देणार्या वेबसाईटच्या लिंक देऊन ग्राहकाला मदत करा.
४. आकर्षक व मुद्देसूद माहिती -
वेबसाईटवर लिहिलेल्या मजकुराची भाषा दर्जेदार हवी. आवश्यकता भासल्यास असे लिखाण करू शकणार्या अनुभवी लेखकांकडे हे काम सोपवा. कारण या माहितीवरच वेबसाईटव कंपनीचा दर्जा, विश्वासार्हता व लोकप्रियता अवलंबून राहणार आहे.
५. बाहेरच्या लिंक मिळवा -
बाहेरच्या वेबमास्टर्सना लिंक देण्यासाठी विनंती करण्यापेक्षा आपल्या वेबसाईतवरील माहितीचा दर्जा असा वाढवा की लोक आपण होऊन तुमच्या वेबसाईटला त्यांच्या वेबसाईटवरून लिंक देतील. ब्लॉग, अभिप्राय, वेब२.० च्या समूहसंपर्क सुविधांचा वापर करून आपल्या वेबसाईटविषयी लोकांना माहिती करून द्या. प्रसिद्ध व्यक्तीच्या मुलाखती व अभिप्राय घ्या. जाहिरात, सेमिनार, प्रशिक्षण कार्यक्रमातून वेबसाईटविषयी माहिती सर्वदूर पोहोचवा. आपल्या इतर वेबसाईट असल्यास त्यातून लिंक देऊन भेट देणार्यांची संख्या वाढवा.
६. संशोधन व नूतनीकरणात सातत्य ठेवा.
SEO साठी बाजारातील स्पर्धा, ग्राहकाचा कल, नवे तंत्रज्ञान यांचा मागोवा घेऊन आपल्या वेबसाईटवरील माहितीत व मांडणीत योग्य ते बदल करा. शोधयंत्रातील आपल्या तसेच स्पर्धकांच्या वेबसाईटच्या प्राधान्यक्रमांचा वारंवार आढावा घ्या. वेबसाईटवरील माहिती शिळी होऊ देऊ नका व प्रसिद्धी तंत्रज्ञानही आधुनिक ठेवा व या सर्वात सातत्य राखा.