प्रज्ञाशोध
लहानपणापासून विद्यार्थ्याच्या मनात सभोवतालच्या परिस्थितीबद्दल व घडणार्या घटनांबद्दल जिज्ञासा असते. कां व कसे, या प्रश्नाचा शोध घेत विद्यार्थी शिक्षण घेत असतो.यातूनच त्याची बुद्धी जागृत होते व प्रज्ञा जन्म घेते. प्रज्ञेचा शोध घेणे म्हणजे प्रज्ञाशोध विध्यार्थ्यामध्ये असलेल्या क्षमतांचे मापन करण्यापेक्षा क्षमतांचे उपयोजन कशा पध्दतीने केले जाते हे महत्वाचे. मनाचा विकास घडला तर क्षमतांचे उपयोजन अधिक चांगल्या पध्दतीने होउ शकते.
भारतात पूर्वी मनाचा विकास कितपत घडला हे तपासून पहाण्याच्या परीक्षा होत्या.ज्या विकासातून माणसाला जीवनदृष्टी प्राप्त होत नाही ती विकासाची विकृत संकल्पना असू शकते.समाजाचे सांस्कृतिक अध:पतन पाहून सात्विक संताप येतो. शिक्षक म्हणून आपण मुलांना घडविण्याचे व्रत धारण केले आहे. वचन हे दुसर्याला दिले जाते तर व्रत हे स्वत:लाच दिले जाणारे वचन असते. या व्रत पालनापासून शिक्षक विचलित झाले म्हणूनच शिक्षणव्यवस्था आज अडचणीत आली आहे. शासन, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यामधील सुसंवाद हरवत चालला आहे. शिक्षणतज्ञ वि.वि.चिपळूणकर म्हणतात शिक्षण म्हणजे दळण नव्हे तर वळण आहे. शिक्षणाच्या संदर्भात जॉन रस्कीन सुध्दा म्हणतात
Education does not mean teaching people to know that they do not know but it means to teach them to behave that they do not behave.
मुलांना ज्याची माहिती नाही त्याचे केवळ ज्ञान देणे म्हणजे शिक्षण नव्हे तर मुलांनी कसे वागायला हवे त्याप्रमाणे त्यांना तसे वागायला प्रवृत्त करणे म्हणजे शिक्षण होय.शिक्षणातून माणुस घडविण्याची क्रांती हीच खरी क्रांती आहे असे आचार्य रजनीश म्हणतात.
प्राचीनकाळी ऋषीमुनींच्या अध्यापन सामर्थ्यावर शिष्यांची प्रचंड श्रध्दा होती. श्रीरामास विश्वामित्र ऋषींनी आपल्या सामर्थ्याचा विकास कसा करावा हे शिकविले होते. आर्य चाणक्य हा शिक्षकच होता. आजच्या काळातसुध्दा असे ऋषीतुल्य शिक्षक आहेत परंतू त्यांचा शोध घेण्याची आज वेळ आली आहे. कालप्रवाहानुसार शिक्षकांच्या भूमिकेत व कार्यपध्दतीत बदल होणे आवश्यक आहे. संगणक व तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेल्या संशोधनाच्या बळावर शिक्षणातील अध्ययन व अध्यापन क्रिया सुलभ होउ लागल्या आहेत. परिपत्रक काढून किंवा आदेशाप्रमाणे नवनिर्मिती होत नाही.तर ती स्वयंप्रेरणेतून तळमळ असेल तर होते अशाप्रकारची भूमिका शिक्षकांची असायला हवी.विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त प्रज्ञेचा शोध घेण्याचा प्रयत्न शाळांबरोबर सामाजिक संस्था करीत आहेत. त्यास शिक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला पाहीजे. हक्कापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे ही भावना प्रत्येक शिक्षकांनी मनात बाळगली तर व अध्यापनाच्या कार्यात झोकून देण्याची वृत्ती अंगी बाणवली तर समाज बदलल्याशिवाय रहाणार नाही. समाजातील शिक्षकाची प्रतिष्ठा परत मिळवायची असेल तर या गोष्टीची गरज आहे.
प्रचलीत स्पर्धा परीक्षा कोणत्या आहेत, त्यासाठी पात्रता काय लागते यशस्वी विध्यार्थ्यांना पूढील शिक्षणासाठी कोणत्या सोयी सुविधा उपलब्ध होतात, या परीक्षांचे आयोजक कोण आहेत कोणत्या संस्थेमार्फत या परीक्षा नियमित केल्या जातात या विषयांची माहिती या विभागात देण्यात येणार आहे.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक - श्रीकांत रानडे, निवृत्त मुख्याध्यापक, विद्यामंदिर, प्रशाला, मिरज मोबाईल-९४२३०१६८५१