आळंदी

      वारकरी संप्रदायात पंढरपूर इतकेच आळंदी या तीर्थस्थानासही मोठे महत्त्व आहे. पुणे शहरापासून अवघ्या २२ कि. मी. अंतरावर हे स्थान असून ते देवाची आळंदी या नावानेही प्रसिद्ध आहे.
इंद्रायणी नदीच्या काठी वसलेल्या या गावी संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेतली (इ.स. १२९६). त्यामुळेच आळंदीचं महत्व फार मोठं आहे. महाराष्ट्रात विठ्ठलभक्तीचा सुकाळ करून वारकरी संप्रदाय निर्माण करणारे लोकोत्तर संत म्हणून सातशे वर्षे अवघ्या महाराष्ट्राने ज्ञानेश्वरांना आपल्या हृदयात जपले आहे. `ज्ञानदेवे रचिला पाया । कळस तुकयाने चढविला' या ओळीनुसार भागवत धर्माची धुरा खांद्यावर वाहणारे हे दोन थोर संत महाराष्ट्राच्या लोकजीवनात अखंड विराजमान झाले आहेत.
ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थान, विठ्ठल-रखुमाईचे मंदिर, सोन्याचा पिंपळ अशी अनेक स्थाने या तीर्थस्थानी भक्तिभावाने पाहण्यासारखी आहेत.
याठिकाणी आषाढी-कार्तिकी एकादशीला यात्रा भरते तसेच ज्ञानेश्वर समाधी दिनी कार्तिक कृ. त्रयोदशीला येथे उत्सव असतो.