गणपतीपुळे

 
    रत्नागिरी जिल्ह्यातील हे ठिकाण जसे निर्मळ समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे तसेच ते तेथील स्वयंभू गणपतीसाठी ही भाविक पर्यटकात खूप प्रसिद्ध आहे. गणपतीपुळे येथील सागर किनारा खरोखरीच अप्रतिम आहे. सलग १२ कि. मी. लांबीचा हा किनारा स्वच्छ व सुंदर आहे.
      येथील वाळू सुद्धा फिकट पांढरी आणि मऊ मुलायम आहे. सकाळच्या कोवळया उन्हात आणि चांदण्या रात्रीच्या चंद्र प्रकाशात तिला वेगळीच लकाकी प्राप्त होते. किनाऱ्यालगत नारळांच्या तसेच फुला-फळांच्या बागा असल्याने समुद्र किनारा सदैव उल्हसित वाटतो.
गणपतीपुळे येथील चारशे वर्षीपूर्वीचे गणपतीचे पुरातन देवालय सागर किनाऱ्यालगत असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी आहे. हा गणपती स्वयंभू असून भाविक लोक संपूर्ण टेकडीलाच गणेश स्वरूप मानून या टेकडीला प्रदक्षिणा घालतात.