मराठी माऊली

* मराठी माऊली *

माझी मराठी माऊली
साऱ्या जगाची सावली
घरी गं माझ्या आली
माझी मराठी माऊली ---- १

शालू सखूचा ल्यायिली
पैठणी बहिणाई आणिली
साऱ्या जगी देखणी
माझी मराठी माऊली ---- २

चोळी जनीच्या हाताची
जरी मुक्तीच्या काठाची
अंगी मऊ मखमली
माझी मराठी माऊली ---- ३

हार नाम्याने घातिला
गजरा सावत्याने माळिला
पैंजण नाथा घाली
माझी मराठी माऊली ---- ४

चुडा तुक्याने भरविला
मुकुट ज्ञान्याने चढविला
सकला हाती धरी
माझी मराठी माऊली ---- ५