डॅडी लॉंगलेग्ज

ज्याला आई, वडील, बहीण, भाऊ, काका, मामा, आजी, आजोबा इत्यादी रक्ताचे नाते असणारे नातेवाईक असतात त्यांना त्या गोष्टीचे काहीच अप्रूप वाटत नाही. काही वेळा तर ‘काय ही ब्याद !’ असा मनाशी विचार करून त्याच्यापासून चार हात लांब कसे राहता येईल असा विचार करणारी मंडळीही आढळतात. पण औषधालाही नातेवाईक नसलेल्या अनाथ मुलांची परिस्थिती मात्र अगदी याउलट असते. आपलं म्हणणारं कोणीतरी असावं यासाठी ती आसुसलेली असतात. आपल्या पाठीवरून मायेचा हात फिरावा, अशा व्यक्तीशी चार शब्द तरी मोकळेपणाने बोलता यावेत एवढीच माफक अपेक्षा असते त्यांची ! आणि अशी एखादी व्यक्ती भेटल्यावर होणारा आनंद हा स्वर्गसुखापेक्षा सुद्धा अधिक मोलाचा वाटतो. या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित असलेली ही कादंबरी ‘ डॅडी लॉंगलेग्ज ’. प्रस्तुत कादंबरीला अप्रतिम साहित्याचा दर्जा लाभला आहे. या कादंबरीचे मूळ लेखक आहेत जीन वेब्स्टर. आणि तिचा मराठी अनुवाद केला आहे सरोज देशपांडे यांनी. तोही तितकाच सरस उतरला आहे. कादंबरीतील पात्रांची इंग्रजी नावे सोडली तर तो अनुवाद आहे हे सांगून सुद्धा खरे वाटणार नाही. कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिची पत्ररूप शैली. कथा पुढे पुढे सरकते ती पत्रांमधूनच. पुस्तकाची आकर्षक बांधणी, मुखपृष्ठ, व अंतर्गत सजावट पाहिल्यावर अनुवादिका सरोज देशपांडे यांनी काढलेल्या पुढील उद्‌गारांवरून राजहंस प्रकाशनबद्दलचा विश्वास सार्थ वाटतो - ‘राजहंस प्रकाशनच्या माजगावकरांकडे पुस्तक सोपविणं म्हणजे मुलगी सुस्थळी पडणं.’

जेरुशा ही जन्मापासून पोरकी असलेली मुलगी आपल्या वयाच्या १६ वर्षापर्यंत ‘जॉन ग्रिअर होम’ या अनाथालयातच राहत असते. आपल्या वाट्याला आलेले कष्टमय जीवन ती आनंदाने बिनतक्रार घालवीत असते. तेथील मेट्रन मिसेस लिपेट तर तिला मुळीच आवडत नसत. अनाथालयाच्या बाहेरचे जग कसे ते मुळी तिला ठाऊक नव्हते. स्वतःचे घर, प्रेमळ नातेवाईक यांच्या सुखाला ती सर्वस्वी पारखी झालेली असताना अचानक तिचे नशीब उदयाला येते. तिची विलक्षण कल्पनाशक्ती पाहून तिच्या पुढील शिक्षणाचा सर्व भार त्याच अनाथालयाचे एक विश्वस्त स्वखुशीने उचलतात. ही गोष्ट समजताच जेरुशाच्या आनंदाला पारावार उरत नाही. अर्थात्‌ अनाथालयाच्या शिस्तीमुळे ती आपला आनंद सुद्धा मोकळेपणाने व्यक्त करू शकत नाही. जेरुशाचा कॉलेजच्या चार वर्षांचा सर्व शैक्षणिक, राहणेखाणे, कपडालत्ता याव्यतिरिक्त तिला वरखर्चासाठी म्हणून दर महिना ३५ डॉलर देण्याची सोयही विश्वस्तांनी केली होती. परतु त्याबदल्यात त्यांची एक अट असते आणि ती म्हणजे जेरुशाने उत्तम लेखिका व्हावे त्यासाठी प्रत्येक महिन्याला आपल्या प्रगतीचा आढावा म्हणून तिने एक तरी पत्र विश्वस्तांना पाठविणे गरजेचे आहे. तिच्या पत्राला विश्वस्त उत्तर देतीलच असे नाही. तसेच तिने विश्वस्तांना कधी भेटायवे पण नाही. जॉन स्मिथ असे खोटे नाव धारण केलेल्या त्या विश्वस्तांचे खरे नाव सुद्धा जेरुशाला कळू नये अशी त्यांची इच्छा. या सर्व अटी मान्य करून जेरुशाच्या शिक्षणाची सुरुवात होते. आणि जॉन स्मिथ यांना तिने पाठवलेल्या पत्रांमधून कथा वेग घेते.

१६ वर्षाच्या कोवळ्या मुलीच्या मनातील भावनांच्या सर्व बारीकसारीक छटांचे दर्शन तिच्या लिखाणातून होते. केवळ एकदाच पाठमोर्‍या पाहिलेल्या जॉन स्मिथ यांना आपल्या जीवनाचा खरा आधार समजून पत्रातून ती त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करते. पहिल्या पत्रात ‘अनाथ मुलांना कॉलेजला पाठविणारे प्रिय दयाळू विश्वस्तसाहेब,’ असा मायना लिहिणारी जेरुशा त्यांना आपली वडीलकी मोठ्या कौतुकाने बहाल करते. जॉनसाहेब उंच आहेत, श्रीमंत आहेत एवढ्याच त्यांच्याबद्दलच्या गोष्टी तिला कळलेल्या असतात. त्याचा उपयोग करून पुढील सर्व पत्रांमधून ‘ डॅडी लॉंगलेग्ज ’ असा मायना ठरवून त्यांचे नवीन नामकरण करते व ते त्यांना आवडले किंवा नाही असेही विचारते. अर्थात्‌ त्यांच्याकडून उलट उत्तराची अपेक्षा नसतेच. त्या मायन्यात व तिच्या पत्राखालील सहीतही अधून मधून सार्थ बदल झालेला आढळतो.

कॉलेजच्या वातावरणातील सर्वच गोष्टी तिला संपूर्णपणे नवीनच असतात. त्याबद्दल समवयस्क मुलींकडून काही वेळा होणारी कुचेष्टा तिच्या मनाला बोचत राहते. त्यावर मात करण्यासाठी तिने केली धडपड, वाचनालयाचा केलेल भरपूर उपयोग, मैदानी खेळात मिळवलेले नैपुण्य, वक्तृत्व, तिच्या खोलीची तिने आपल्या परीने केलेली सजावट अशा सर्व घटनाची माहिती देत पत्रातून जेरुशा आपल्या वडिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत राहते. यातूनच तिची भाषाशैली सुधारत जाते. तिच्या काही कथा, लघुनिबंध प्रसिद्ध होतात. एवढेच नव्हे तर ती एक कादंबरी सुद्धा लिहिते. या लेखनातून तिला स्वतःवी थोडीफार आर्थिक प्राप्तीही होऊ लागते. या पैशाचा विनियोग योग्य रीतीने करण्याची तिची मनोवृत्ती पहिल्यावर केवळ आश्चर्य वाटल्यवाचून राहत नाही. जॉन स्मिथ यांच्यामुळेच आपल्याला शिक्षण घेता आले याची पुरेपुर जाणीव तिला आहे. त्या पैशाची परतफेड करते हे विशेष. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेरुशाने पत्रातील आपले म्हणणे स्प्ष्ट करण्यासाठी काही वेळा रेखाचित्रे काढली आहेत. चित्रे साधीच आहेत. पण याचा उपयोग प्रत्येकाला आपापल्या आयुष्यातही करता येईल.

सॉनेटच्या शेवटच्या ओळीत जसं कवितेला एकदम वेगळं वळण दिलेलं असतं, तसंच काहीसं या कादंबरीतील शेवटच्या पत्रात आहे. जेरुशा उर्फ ज्युडी (तिने स्वतःचंच ठेवलेलं लाडकं नाव), मास्टर जर्वी ( जेरुशाच्या आयुष्यात आलेला पहिलाच पुरुष - ज्युलिआचे जेरुशाच्या मैत्रिणीचे काका ) आणि डॅडी लॉंगलेग्ज यांच्यातील नात्याचा गौप्यस्फोट यामुळे कादंबरीला वेगळीच उंची प्राप्त झाली आहे.


डॅडी लॉंगलेग्ज
मूळ लेखक - जीन वेब्स्टर
मराठी अनुवाद - सरोज देशपांडे
राजहंस प्रकाशन - मार्च २००८
किंमत - १०० रु.