बहुशाखा विषयनिवडीची मुभा विद्यार्थ्यांना मिळणार

संदर्भ - सकाळ वृत्तसेवा दि. १५-१-२०१२
नवी दिल्ली - विज्ञान शाखेचे विषय वाणिज्य आणि कला शाखा अभ्यासक्रमासाठी निवडता येतील काय? याचे उत्तर सद्यःस्थितीत नाही असले, तरी यापुढील काळात कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्याला आपल्या आवडीचे विषय निवडण्याची मुभा देण्याचा विचार मनुष्यबळ विकास मंत्रालय करीत आहे. यामुळे भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र आणि संस्कृत किंवा अन्य असे तिन्ही शाखांचे विषय विद्यार्थ्यांना बारावी किंवा पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी निवडता येतील.

विषयनिवडीचे स्वातंत्र्य देण्यासंबंधीच्या विषयावर 27 जानेवारी रोजी कुलगुरू आणि मुख्याध्यापकांच्या बैठकीत चर्चा झाली होती. या प्रस्तावावर विचार करण्यासाठी दहा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सहसचिव एस. सी. खुंटिया यांच्याकडे समितीचे नेतृत्व देण्यात आले असून, सप्टेंबरअखेर ही समिती सूचनांसह आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे. तज्ज्ञांची ही समिती मूल्यांकन आणि परीक्षा पद्धतींचाही अभ्यास करणार असल्याचे केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

"सीबीएसई' आणि "आयसीएसई' संलग्न काही शाळांमध्ये बहुशाखीय विषयनिवडीचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे; परंतु अनेक राज्यांतील शिक्षण मंडळे आणि विद्यापीठांनी त्यास परवानगी दिली नाही. यामुळे सर्व स्तरांवर असे धोरण राबविण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.