बिगरी ते मॅट्रिक : आनंददायी शिक्षणाचे तीन कोन!

सौजन्य संदर्भ - लोकसत्ता १८-१-२०१२ डॉ. मानसी राजाध्यक्ष, सोमवार, १६ जानेवारी २०१२
शालेय शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातलं एक महत्त्वाचं पर्व. शालेय व्यवस्थेचा विद्यार्थ्यांना पुरेपूर आनंद आणि लाभ मिळायला हवा. त्यासाठी पालकांची, विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांचीही भूमिका कशी असावी, याचे विश्लेषण करणारे हे सदर.. महिन्यातून एकदा.. शालेय शिक्षण घेताना संकल्पना समजण्यावर भर दिला गेला पाहिजे. संकल्पनेवर आधारित शिक्षणाचे दूरगामी फायदे आहेत. ‘गुण’ आधारित शिक्षण असण्यापेक्षा ते ‘संकल्पना’ आधारित असायला हवं. तसं करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. मात्र त्यामध्ये सुसूत्रता येण्यासाठी, त्यातून उत्तम अशी पुढची पिढी घडण्यासाठी समाजातल्या सर्व स्तरांवर एकमताने

प्रयत्न व्हायला हवेत. ते कसे करता येतील? पालकांनी आपल्या पाल्याचा अभ्यास किती, कसा आणि का घ्यावा? शाळेव्यतिरिक्त एरवी अभ्यास कसा आणि का करावा? शिकवणीवर्गाला जाण्याची गरज आहे का? चला या प्रश्नांची उत्तरं शोधूया! सुप्रसिद्ध वैज्ञानिक आणि शिक्षणतज्ज्ञ प्रा. यश पाल म्हणतात, ‘शिक्षण अशाच गोष्टींना म्हणता येईल, जे आयुष्यात मजा आणतं, आनंद देतं!’ आपल्यापैकी कित्येकजण लहानपणी शाळा-शाळा हा खेळ खेळले असतील. खेळताना काही जणांनी विद्यार्थ्यांची भूमिका केली असेल तर काहींनी शिक्षकांची, कदाचित काहींनी मुख्याध्यापकांचीसुद्धा! पण निश्चितच हा खेळ खेळताना सर्वाना निखळ आनंद मिळाला असेल. आपल्या घरात, ओळखीत एखादं एक-दोन वर्षांचं मूल असतं. त्याला चालायला, बोलायला यायला लागलं की, ते एखादं छोटंसं दप्तर पाठीला लटकवत ‘मी आत्ता शालेला च्चालल्लो,’ असं बोबडं बोलत, शाळेला जाण्याचा अभिनय करतं! बऱ्याच वेळा त्या मुलाला आपण कधी एकदा शाळेत जातो, असं झालेलं असतं. कारण तिथे गेल्यावर आपल्याला खूप काही आनंद मिळणार आहे, खूप काही मनासारखं करायला मिळणार आहे, अशी त्याची धारणा असते. मात्र प्रत्यक्षात शाळा नावाच्या वास्तूत गेल्यावर मुलांना अपेक्षित निखळ आनंद मिळतो का?

आपल्या मुलाला, त्याच्या आयुष्याची तब्बल १२-१३ वर्षे, शाळा नावाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या इमारतीत किंवा परिसरात घालवायची असतात. हे लक्षात घेत आपल्या बछडय़ाला कुठल्या शाळेत घालावं यावर खूप चिकित्सा करून, अनेक तज्ज्ञांची मत वगैरे घेऊन आपण यासंबंधीचा निर्णय घेतो. पण गेल्या १० -१५ वर्षांत कितीतरी पालक आपल्या पाल्याच्या शाळेबद्दल शंभर टक्के समाधानी असल्याचं पाहण्यात येत नाही.

शालेय शिक्षणाला तीन कोन आहेत, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी! सध्यातरी एका कोनात स्वत: उच्चशिक्षित किंवा अगदी अशिक्षित, पण स्वत:च्या मुलाच्या शिक्षणाच्या बाबतीत असमाधानी असलेले पालक दिसतात. दुसऱ्या कोपऱ्यात पालकांच्या आणि शिक्षण संस्थेच्या वाढत्या जबाबदाऱ्यांखाली धावपळ करणारे आणि नवीन पिढीच्या तल्लख पण स्पष्टवक्त्या विद्यार्थ्यांबद्दल सतत तक्रार करणारे शिक्षक आहेत. सर्व समाजव्यवस्थेच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेले आणि त्यात स्वत:चं व्यक्तिमत्त्व आणि आनंद दोन्ही हरवून बसलेले विद्यार्थी हे या त्रिकोणाच्या तिसऱ्या कोनात आहेत! आणि हे तिन्ही कोन एकमेकांना कधीही भेटण्याची शक्यताच दिसत नाही. हे असं का होतंय? यावर काही उपाय आहे का? मुळात शालेय शिक्षण नक्की महत्त्वाचं आहे ना? असल्यास कितपत? आणि मग ते कसं असावं, असे नानाविध प्रश्न साऱ्यांनाच भंडावत आहेत.

सध्या आपल्याकडे भाराभर परदेशी संस्था ‘शालेय शिक्षण’ नावाचं एक उत्पादन घेऊन येऊ पाहताहेत. निरनिराळी तंत्रज्ञानं वापरून, अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी आवरणांनी सजवून त्यात शालेय शिक्षण नावाचं ज्याला जे वाटेल ते पॅकेज घातलं जातंय. जेवढं शुल्क अधिक, तेवढं उत्तम शिक्षण मिळेल अशा भावनेने काही तथाकथित उच्चभ्रू पालक अशा ‘चकाचक’ शाळांकडे वळण्यात नसता आनंद मानताहेत, तर काही जण आपण खेडेगावात राहतो आणि तिथे आपल्या मुलाला शहरी मुलांसारख्या सुविधा मिळत नाहीत म्हणून मूल जगाच्या मागे तर पडणार नाही ना, म्हणून नसत्या चिंतेत आहेत.

खरं तर तुम्ही जगात कुठल्याही देशात जा, त्या देशातल्या शालेय शिक्षणाच्या तुलनेत तुम्हाला भारतातील पूर्वापार चालत आलेलं जे शालेय शिक्षण आहे तेच सर्वात उत्तम आहे, हे लक्षात येईल. त्यातच भारतीयांची कुशल बुद्धिमत्ता ही वादातीत आहे. पण म्हणून आपण काय जुनीपुराणी शालेय शिक्षण पद्धतीच कुरवाळत बसायची का? जगात वापरात असलेली आधुनिक शिक्षणविषयक तंत्रज्ञान वापरायची नाहीत का? आपण ‘अजूनही छडी लागे छमछम, विद्या येई घमघम!’ हाच पूर्वीचा कित्ता गिरवत राहायचा का, असाही प्रश्न छळत राहतो.

प्रश्न अनेक आहेत, पण सर्वात आधी आपण मुळात आपल्याला काय मिळवायचं आहे, त्याचा विचार करूया. शालेय शिक्षण हे माणसाच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यासाठी असतं आणि असावं. आपल्या आजूबाजूच्या परिसरात असणाऱ्या आणि रोजच्या आयुष्यात लागणाऱ्या सर्व संकल्पना समजण्यासाठी शालेय शिक्षण असतं. शालेय शिक्षणाचा उपयोग हा निव्वळ उत्तम गुण मिळवण्यासाठी नसून आपलं आयुष्य आनंददायी आणि यशस्वी करण्यासाठी आहे. माझा मुलगा अमुक तमुक परदेशी बनावटीच्या उच्चभ्रू शाळेत जातो, हे छाती फुगवून आपल्या स्नेह्य़ांना सांगण्यापेक्षा, माझ्या मुलाला पाठय़पुस्तकातल्या संकल्पना मस्त समजल्या आहेत आणि तो त्या रोजच्या व्यवहारात खूप छान वापरतो हे अभिमानाने सांगणं आपल्याला महत्त्वाचं वाटायला हवं. संकल्पना समजल्या तर त्या वापरताही येतात आणि हो.. संकल्पना समजल्या तर कुठल्याही अटीतटीच्या स्पर्धा परीक्षेत चांगले गुणही आपोआपच मिळतील. मग ‘क्लासेस’ची विलक्षण जीवघेणी धावपळ संपेल. ‘आपल्या समीरला शेजारच्या आदित्यपेक्षा एक मार्क कमी मिळाला,’ याचं दु:ख वाटणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे संकल्पना समजल्या की, विद्यार्थ्यांसाठी शिकण्याची प्रक्रिया आनंददायी होते, तणावमुक्त होते. त्यासाठी कुठली शाळा, हे महत्त्वाचं नाही. त्या शाळेतले शिक्षक, संकल्पना किती व्यवस्थित आणि कशाप्रकारे समजावून सांगतात, त्या तशा सांगताना ते वेगवेगळ्या शैक्षणिक साधनांचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा किती कल्पकतेने वापर करतात, हे जास्त महत्त्वाचं आहे. शिवाय आपण आपल्या लेकाचा किंवा लेकीचा शिकण्याचा आनंद, आपल्या अवास्तव अपेक्षांच्या ओझ्याखाली दाबून टाकत नाही आहोत ना, याचं भान पालकांनी ठेवलं पाहिजे. आपल्याला एक समर्थ, समाधानी, धाडसी, जबाबदार आणि सकारात्मक पिढी घडवायची आहे, याची काळजी त्रिकोणाच्या तिन्ही कोनांनी घ्यायला हवी. आणि ती कशी घेता येईल, यावर विचार करण्यासाठी आपण दरमहा या सदरातून भेटणार आहोत.