नागरिकशास्त्र - एक महत्वाचा पण दुर्लक्षित विषय

शालेय स्तरावर अभ्यासास असणार्‍या विविध विषयांच्या भाऊगर्दीत नागरिकशास्त्र हा महत्वाचा विषय आपले महत्व हरवून बसला आहे. लहान मूल जसे मोठ्यांचा हात धरून असते त्याप्रमाणे इतिहास भूगोलाच्या विषय जोडगोळीत नागरिकशास्त्रास अंग चोरून बसावे लागत आहे. प्रश्नपत्रिकेतही या विषयावर एखादाच प्रश्न व तोही क्लिष्ट व्याख्या व मुद्दे पाठ करून लिहावा लागत असल्याने मुले शक्यतो हा विषय ऑप्शनला टाकतात. साहजिकच सुजाण नागरिक बनण्याचे शिक्षण न घेताच शालेय शिक्षण पूर्ण होते.

आपल्या देशात राज्यघटना, लोकशाहीचा खरा अर्थ, नागरिकांची कर्तव्ये याबाबतीत सर्वसामान्य जनतेत जे अज्ञान दिसून येते याला नागरिकशास्त्रासारख्या महत्वाच्या विषयाकडॆ केलेले अक्षम्य दुर्लक्षच कारणीभूत आहे असे मला वाटते.

आपल्याकडे नागरिकशास्त्र या विषयाला महत्व दिले जाते ते फक्त प्रशासकीय उच्च पदासाठी असणार्‍या स्पर्धा परिक्षांमध्ये. या परिक्षा देणार्‍यांची संख्या फारच कमी असते. नागरिकशास्त्र सर्व जनतेसाठी असावयास हवे व ते लहानपणीच, संस्कारक्षम वयात म्हणजे शालेय स्तरावर दिले गेले पाहिजे. राजकीय व सामाजिक क्षेत्रासाठीदेखील नागरिकशास्त्राची पदवी परिक्षा अनिवार्य ठेवली तर राजकारण व सहकार यात निश्चित सुधारणा होईल.

इतर सर्व विषय व्यक्तीमत्व विकास व व्यवसाय यांसाठी आवश्यक असल्याने त्यांचे महत्व विद्यार्थ्यांना समजते. मात्र नागरिकशास्त्रास व्यक्तीच्या दृष्टीने फार महत्व नसले तरी समाजाच्या व देशाच्या दृष्टीने याला अनन्य साधारण महत्व आहे. हा विषय अधिक सोपा, रंजक करून तसेच त्याला कृतीशील उपक्रमांची जोड देऊन लोकशाही, समाजवाद व राष्ट्रीयत्व यांचे महत्व मुलांच्या मनावर बिंबवले तर मोठेपणी त्यांचेकडून भ्रष्टाचार, विध्वंसक कृत्ये घडणार नाहीत. जातीय, धार्मिक वा प्रांतीय भेदांच्याऎवजी राष्ट्रीयत्वाची भावना त्यांच्या मनात जागृत होईल व शांतता, विकास व सहजीवन या दिशेने भविष्यात आपल्या देशाची वाटचाल सुनिश्चित होईल.

------डॉ. सु. वि. रानडे