‘परीक्षा नको’ : विद्यार्थ्यांसाठी वरदान

सौजन्य संदर्भ- दै. लोकसत्ता,डॉ. मनीष देशपांडे ,सोमवार, ३० जानेवारी २०१२9(This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.)

विद्यार्थ्यांचं मूल्यमापन हे विद्यार्थी, पालक, शिक्षक व समाज या सर्व घटकांना योग्य झालं असं वाटलं पाहिजे. त्यासाठीची सर्वसमावेशक रचना व नियंत्रण असणारी व्यवस्था निर्माण करणं हे एक आव्हान होतं. हे आव्हान आपल्या शिक्षणतज्ज्ञांनी स्वीकारून मूल्यमापनाची अभिनव पद्धती शोधून काढली. नव्हे जन्माला घातली. ‘सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापन’ ही पद्धती आता सर्वच शाळांमध्ये रुजू लागली आहे.. शि क्षण म्हणजे आत्म्याचा विकास, असं महात्मा गांधींनी म्हटलं आहे. आत्मोन्नती किंवा स्वविकास सहज शिक्षणातून होत असतो. हे ‘सहज’ शिक्षण सध्याच्या काळात दुर्मिळ होत चाललं आहे. शाळा-महाविद्यालये ही फक्त परीक्षा केंद्रे होत आहेत आणि विद्यापीठे किंवा परीक्षा मंडळे ही ‘सर्टिफिकेट’ देणाऱ्या संस्था. हे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख सांगत नाहीत किंवा त्यांच्या विकसित झालेल्या क्षमता स्पष्ट करीत नाहीत. तर केवळ कागदावर उतरविलेल्या तोकडय़ा ज्ञानाची किंमत सांगतात. त्या देखील वादातीत नाहीत. मग परीक्षा हव्यात कशाला?

बालकाची प्रत्येक हालचाल टिपून त्याच्या विकासासाठी किंवा योग्य दिशेने त्याची पावले पडावीत. तसेच त्याचं भावविश्व टप्प्याटप्प्यानं विशाल व्हावं. त्याच्या शारीरिक हालचाली किंवा कृती या शारीरिक विकासासाठी पूरक व्हाव्यात. त्याची दृष्टी नेमकेपणाने सौंदर्य टिपणारी व्हावी. त्याचा विचार निरीक्षणातून व्यापक व्हावा. त्याची बुद्धी असामान्यतेकडे झुकणारी व्हावी आणि त्याचं मन पाण्यासारखं नितळ व्हावं. त्यासाठी शिक्षणातून काही धडपड झाली तर बालक निश्चितपणे सर्वागीण विकासाच्या दिशेनं झेपावतो आहे, असं म्हणता येईल.

कुमारावस्थेत शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमतांमध्ये कमालीचे बदल होत असताना विद्यार्थ्यांला मित्रत्वाने सोबत राहणाऱ्या मित्रमैत्रिणींबरोबरच शिक्षक-पालकांचा आधार वाटत असतो. परंतु, परिस्थिती अगदी उलट आहे. समवयस्क मित्रमैत्रिणींमध्येच समायोजन क्षमतांचा अभाव आहे. शिक्षक आपल्या अभ्यासक्रमाशिवाय इतर बाबींवर विद्यार्थ्यांशी चर्चा करायलाही तयार नाहीत. आपल्याला काय करायचंय, या भावनेनं विद्यार्थ्यांना टाळण्याचा प्रयत्नही बऱ्याच अंशी होतो. अशावेळी एखादा शिक्षक किंवा पालक मित्रत्वाच्या नात्यानं बालकाच्या भावना समजून घेऊन त्याच्या मनातील काहूर थोपवून त्याला वेगळ्या दिशेनं जाण्याची प्रेरणा देत असेल, त्याच्या क्षमता ओळखून त्यानुसार योग्य मार्गदर्शक म्हणून सोबत राहत असेल तर तो शिक्षक किंवा पालक एक राष्ट्रीय कार्य करतो आहे असे म्हणावे लागेल. पण हा योग तसा दुर्मिळच.

शिक्षणाचा सध्याचा बाजार, योग्य मार्गदर्शकाचा अभाव, विद्यार्थ्यांना त्यांच्या भावभावना समजून घेऊन मित्रत्वाच्या नात्यानं त्यांचं ‘लर्निग’ सहज करणाऱ्या शिक्षकांचा अभाव या बाबी शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात उदासीनता निर्माण करणाऱ्या आहेत.

या सर्वाचा विचार करूनच भारत सरकारनं शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ लागू केला व शिक्षणाला अनौपचारिक शिक्षणाची झालर देण्याचा कृतीयुक्त प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताणतणाव तसेच दडपण कमी करूनच भयमुक्त शिक्षणाचं दालन या अधिनियमानं खुलं केलं, असं म्हणता येईल. सामान्यत: कोणतीही परीक्षा म्हटलं की, विद्यार्थी पहिल्यांदा त्याचं दडपण, भीती आणि ताणतणाव यामध्ये राहतो. परीक्षेपूर्वी अभ्यासाचं दडपण तर परीक्षेनंतर किती गुण मिळतील याचं दडपण. या दडपणांमधून बाहेर येण्यासाठी ‘परीक्षा नको’ हा विचार पटायला लागतो. कधी-कधी हा ताण इतका वाढतो की एखादा विद्यार्थी अनावश्यक पाऊल उचलतो किंवा आपलं जीवनच संपवतो. मग आपण त्याची केवळ चिकित्सा करतो. त्यावरच्या प्रभावी उपायांवर आपण कृती तर सोडाच पण साधं भाष्य करणंही टाळतो.

विद्यार्थ्यांचं मूल्यमापन हे विद्यार्थी, पालक, शिक्षक व समाज या सर्व घटकांना योग्य झालं असं वाटलं पाहिजे. त्यासाठीची सर्वसमावेशक रचना व नियंत्रण असणारी व्यवस्था निर्माण करणं हे एक आव्हान होतं. हे आव्हान आपल्या शिक्षणतज्ज्ञांनी स्वीकारून मूल्यमापनाची अभिनव पद्धती शोधून काढली. नव्हे जन्माला घातली. सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापन ही पद्धती आता सर्वच शाळांमध्ये रुजू लागली आहे.

परीक्षा नाही म्हणजे नेमके काय, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तरच मूल्यमापनाचे नवे आयाम सर्वाना लक्षात येतील. बालकानं या सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापनाचा घटक होणं म्हणजे शाळेत दाखल होणं आवश्यक आहे. अनेक शाळाबाह्य मुले या शिक्षणाच्या प्रवाहातच नाहीत. जे आहेत ते टिकले पाहिजेत आणि जे टिकले ते सुसंस्कारित व विवेकी व्हावेत अशी सामान्य अपेक्षा आहे. हे करीत असताना पालकांनी आपल्या पाल्याला अवास्तव अपेक्षा ठेवून शाळेत दाखल न करता सहज ज्या गोष्टी आपल्या पाल्याला जमतात त्याचा आग्रह धरला पाहिजे.

इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शाळेत शिकत असताना प्रत्येक बालकांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक तसेच सामाजिक क्षमतांच्या विकासांचे वयोगटानुसार टप्पे निश्चित करून त्या त्या टप्प्यानुसार निरीक्षण व नोंदी करून, ‘ओपन बुक’ चाचणी घेऊन किंवा विद्यार्थ्यांना गटकार्य देऊन, वैयक्तिक अभिव्यक्तीची संधी देऊन, ‘चुका व शिका’ पद्धतीने त्यांचे अनुभवविश्व अधिक व्यापक करणं अशी सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापन पद्धती ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत विकासासाठी पूरक, पोषक व परिणामकारक ठरणारी आहे.

भयमुक्त व कॉपीमुक्त परीक्षा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शालेय परीक्षेमध्ये अधिक पारदर्शकता आणणं व त्यातून विद्यार्थ्यांचा विश्वास व आत्मविश्वास वाढविणं ही काळाची गरज आहे. प्रचलित परीक्षा पद्धतीतील दोष दूर करून केवळ पाठय़पुस्तकातील ज्ञानाचं मूल्यमापन करण्यापेक्षा समग्र मूल्यमापन हे समर्थ विद्यार्थी घडविण्याच्या दृष्टीने उचललेलं धाडसी पाऊल आहे.

ओपन बुक चाचणी ही तर स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर वस्तुनिष्ठ स्वरूपाची व गुणांऐवजी ‘श्रेणी’ देणारी मूल्यमापन पद्धती ही आधुनिक व विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला, निरीक्षणाला व नियोजनाला वाव देणारी अशी पद्धती आहे.

विद्यार्थ्यांनी शिक्षणक्रम पूर्ण करताना केलेल्या वेगवेगळ्या बाबींच्या नोंदी व त्यातून त्यांचे समोर आलेले व्यक्तिमत्त्व उलगडणारे पैलू यातून त्यांचा ‘स्वोट अॅनालिसिस’ यात केला जातो. विद्यार्थ्यांना त्यांच्यातील प्रभावी गुण, कमतरता, त्यांच्या व्यक्तित्वाला साजेशा संधी आणि त्या संधी प्राप्त करण्यासाठी स्वीकारायची आव्हाने यांचं विश्लेषण करणारी मूल्यमापन पद्धती एक वरदान ठरणार हे नक्की.

‘डोळा’ या एकमेव ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून व्यक्ती जवळपास ८३ टक्के ज्ञान मिळविते. याचा आधार घेऊन विद्यार्थ्यांची निरीक्षण क्षमता व त्यातून नवनवीन संकल्पनांची त्यांच्या ज्ञानात पडणारी भर वेळोवेळी शिक्षकांनी टिपणं व त्या ज्ञानाच्या आधारावर विद्यार्थ्यांनी केलेली स्वत:ची ज्ञानरचना यात अपेक्षित आहे. ही ज्ञानरचनावाद अध्ययनाला गती देणारी पद्धती विद्यार्थ्यांच्या संकल्पना व विचार शक्तीला प्रगल्भ करणारी अशी आहे.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं सहा ते १४ वयोगटात त्यांच्या विद्यार्थ्यांचे टप्प्याटप्प्याने झालेल्या सर्वसमावेशक बदलांचे निरीक्षण करून एक-एक विद्यार्थी कोणकोणत्या क्षमतांनी परिपूर्ण आहे व कोणत्या क्षमता त्याच्यामध्ये विकसित करण्यास वाव आहे याचा समग्र लेखाजोखा श्रेणीच्या स्वरूपात वयाच्या चौदाव्या वर्षी समोर आणायचा आहे. या मूल्यमापनामुळे विद्यार्थ्यांचं माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण कोणत्या पद्धतीनं होणार आहे किंवा कोणत्या विद्याशाखेकडे त्याचा कल आहे हे नि:संशयपणे सांगता येईल.

त्यामुळे केवळ ज्ञान व आकलनावर आधारित व गुणांना महत्त्व देणाऱ्या मूल्यमापनापेक्षा ज्ञानाचे उपयोजन व कौशल्यांचा आविष्कार घडवून आणणारी मूल्यमापन पद्धती ही ‘परीक्षा नको’ ही संकल्पना अधिक नेमकेपणानं स्पष्ट करणारी अशी आहे. उदासीनतेच्या, नैराश्यतेच्या गर्तेतून बाहेर काढून विचार आणि कृतीच्या दृष्टीने अनुभवसंपन्न व सकारात्मक दिशेनं वाटचाल करणारा विद्यार्थी घडवायचा असेल तर आधुनिक मूल्यमापन पद्धतीचं मनातून स्वागत करून ही पद्धती प्रभावीपणे रूजविण्यासाठी शाळांना व शिक्षकांना विद्यार्थी, पालक व समाजाने आग्रह धरला पाहिजे. अशी सांघिक कृती विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर नेऊ शकेल.