शाळांमध्ये देणार व्यावसायिक शिक्षण

संदर्भ - दै.लोकमत २२-१-२०१२
शिक्षणमंत्र्यांच्या समितीचा अहवाल स्वीकृत; २0१३पासून लागू

नवी दिल्ली - शिक्षणाला रोजगाराभिमुख बनविण्याच्या दृष्टीने शालेय स्तरापासून व्यावसायिक पाठय़क्रम सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या संदर्भात राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांच्या समितीचा अहवाल मानव संसाधन विकास मंत्रालयाने स्वीकार केला आहे. हा अहवाल आता मंजुरीसाठी लवकरच केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळासमक्ष (केब) ठेवला जाईल. या कार्यक्रमाची २0१३ पासून अंमलबजावणी करण्याची योजना आहे.

मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, शाळांमध्ये इयत्ता नववीपासून व्यावसायिक शिक्षण पाठय़क्रम सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. या उद्देशाने राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण पात्रता संरचना तयार करण्यासाठी राज्यांसोबत विचारविर्मश करण्यात आला होता.

बिहारचे शिक्षणमंत्री पी. के. साही यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणमंत्र्यांची एक समिती स्थापण्यात आली होती. या समितीने दिलेला अहवाल स्वीकृत करण्यात आला आहे. आता हा अहवाल ‘केब’कडे पाठविण्यात येईल. सरकारच्या आराखड्यामध्ये सातस्तरीय प्रमाणन व्यवस्था असेल आणि ती स्नातकपर्यंत राहील. पहिल्या दोन स्तरांपर्यंतचा अभ्यास आणि प्रशिक्षण कार्य सीबीएसई आणि राज्य शिक्षण मंडळांतर्गत होईल. हा अभ्यास नववी, दहावी आणि अकरावी व बारावी स्तरावर असेल. नंतर तो स्नातक स्तरापर्यंंत वाढविण्यात येईल.