शिक्षण हक्कात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची

संदर्भ - सकाळ वृत्तसेवा दि. २-४-२०१०
नवी दिल्ली - सहा ते चौदा वर्षांखालील सर्व स्तरातील मुला-मुलींना शिक्षण प्राप्त व्हावे, यासाठी शिक्षण हक्‍क अधिकाराच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी देशातील सर्व राज्य सरकारांपासून जिल्हा आणि ग्रामीण स्तरापर्यंतच्या सर्वच यंत्रणांनी हा राष्ट्रीय प्रयत्न यशस्वी करण्यासाठी एकजुटीने काम करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. तसेच, या प्रयत्नात मोलाची कामगिरी शिक्षकांना बजावावी लागणार असून, त्यांनी आपल्यावरची जबाबदारी ओळखून हे मिशन यशस्वी करण्यास मोलाचा वाटा उचलावा, असे आवाहनही केले.

शिक्षण हक्‍क अधिकार कायदा आजपासून देशात लागू होत असल्याच्या निमित्ताने पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. शिक्षणाच्या परिघाबाहेर असलेल्या गरीब आणि वंचित मुलांना या कायद्यामुळे हक्‍काने शिक्षण मिळू शकणार आहे. अनेक राजकीय व आर्थिक अडथळे पार करीत संयुक्‍त पुरोगामी आघाडी सरकारने शिक्षण हक्‍क अधिकाराच्या कायद्याची अंमलबजावणी केली. सर्व राज्य सरकारांबरोबरच जिल्हा, ग्रामीण स्तरावरील यंत्रणेला आणि शिक्षकांनीही आपल्या कर्तव्याबाबत जबाबदारी ओळखून या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. शिक्षकांचे समाजातील स्थान मोलाचे आहे. त्यांची प्रतिभा व सर्जनशीलतेचा लाभ सर्वांना व्हावा, यासाठी शिक्षकांना सन्मानाने काम करता यावे, यासाठी आपण प्रयत्न करण्याची गरज आहे. पालकांनीही शाळेच्या व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावावी, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्‍तीने शिक्षण दिले जावे, यासाठीचा कायदा संसदेने ऑगस्ट 2009 ला तयार केला होता. आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच पंतप्रधानांनी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांची आठवण काढीत, गोखले यांनी शंभर वर्षांपूर्वी विधानसभेत भारतीयांना शिक्षणाच्या अधिकाराचा कायदा बनवला जावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर जवळपास 90 वर्षांनंतर शिक्षणाचा मूलभूत अधिकाराचा कायदा मिळावा, यासाठी भारतीय घटनेत सुधारणा केल्याने आपल्याला आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.

कोणत्याही सामाजिक आणि आर्थिक स्तरातील मुलांना लिंग भेदाभेद न करता शिक्षण मिळावे, यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत शिक्षणाच्या माध्यमातून प्राप्त झालेले ज्ञान व मूल्यांमुळेच देशाला जबाबदार आणि जागरूक नागरिक मिळतील, ज्यांच्या हातात देशाचे भवितव्य सुरक्षित असेल, असा विश्‍वास त्यांनी या वेळी व्यक्‍त केला. या कायद्याची अंमलबजावणी करताना मुली, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांवर अधिक लक्ष देण्याची गरजही त्यांनी व्यक्‍त केली.

आज मी आहे तो शिक्षणामुळेच

अर्थशास्त्राचे तज्ज्ञ आणि मूळ शिक्षकाचा पिंड असलेले पंतप्रधान भाषणाच्या शेवटी भावुक झाले होते. शिक्षणाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, "सामान्य कुटुंबात माझा जन्म झाला असल्याने शाळेत जाण्यासाठी दूरवर चालत जावे लागे. रात्रीच्या वेळी अभ्यास करण्यासाठी अंधूक प्रकाश असलेल्या केरोसिनच्या दिव्याखाली अभ्यास करावा लागे. मात्र, मी आज जो काही आहे तो केवळ शिक्षणामुळेच.' शिक्षणाचा हा प्रकाश देशातील प्रत्येक मुलाच्या आयुष्यात पडावा, अशी आशा त्यांनी व्यक्‍त केली.