Swami Vivekananda

वरीलपैकी दीड लाखाची व्यवस्था आम्ही पुढीलप्रमाणे केली :-
सहा स्नेह्यांकडून प्रत्येकी २५ हजार रूपये याप्रमाणे तीन वर्षे मुदतीच्या ठेवी घेऊन त्यांची दीड लक्ष रूपयांची रक्कम युनिव्हर्सिटीच्या नांवे वर्ग केलेली अशी ठेव ठेवून ही अट पुरी केली. ज्या गृहस्थांनी ही अट पुरी करण्याचे कामी मदत केली त्यांच्या नावांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो. (१) श्री. के. व्ही. केळकर, (२) श्री. स. ग. गोखले, (३) श्री. के. एम. व्होरा, मुंबई, (४) श्री. वि. श्री. पटवर्धन, मिरज, (५) श्री. सी. जे. शहा, (६) पुणे अ. वि. गृहाचे श्री. वि. गं. केतकर. (त्यांच्या संस्थेजवळ अशी काही रक्कम होती व तिचा उपयोग शैक्षणिक कार्याकडे करण्यास थोडा अवधि होता. म्हणून त्यांनी ही रक्कम आमच्या कार्याला तात्पुरती दिली व आमच्या संस्थेस अपूर्व उत्तेजन दिले. या त्यांच्या थोरवीबद्दल आम्ही त्यांचे सदैव ऋणीच राहूं. ही रक्कम त्यांना परत गरज लागेपर्यंत त्यांनी आमच्याकडे ठेव स्वरूपात ठेवली होती.)
सर्व ठेवीदारांना असा विश्वास वाटत होता की, बँकेतील ठेव जरी दुसर्‍याचे नावांने असली तरी ती पूर्ण सुरक्षित आहे. याप्रमाणे दीड लाखाची व्वस्था झाली व तीन लाखांची व्हावयाची राहिली. त्या कामी महाराष्ट्र बँकेचा उपयोग होईल अशी एकदा कल्पना आली. पण प्रस्थापक सभासदांपैकी चार पांच जण बँकेचे डायरेक्टर असल्यामुळे तसे करणे हितकर नाही असें म्हणून तो मोह आम्ही कटाक्षाने टाळला. तीन लाख रूपयांची अशा स्वरूपाची मदत करूं शकेल अशी महाराष्ट्रातील दुसरी संस्था म्हणजे वेस्टर्न इंडिया विमा कंपनी. त्यांचेकडे शब्द टाकण्याचे ठरविले.
त्याप्रमाणे श्री. आण्णासाहेब चिरमुले यांची गाठ घेऊन संस्थेची गरज व असे पैसे ठेवण्यात कशी सुरक्षितता आहे याबद्दलची सविस्तर माहिती त्यांनी दिली. हा व्यवहार बँकेच्या साध्या व्यवहारांत बसणारा केव्हांच नव्हता हे आम्हांस कबूल करावेच लागले. परंतु केवळ संस्थेची उपयुक्तता पाहून आमची सोय करण्याचे त्यांनी दूर करण्याकरिता बोर्डाची विशेष सभा घेऊन आमचे कार्य पुरें केले. त्याकरिता त्यांनी आपल्या स्वदेशी कमर्शिअल बँकेचाहि आम्हांस उपयोग करू दिला, व आमची अडचण भागविली. त्याकरितां श्री. चिरमुले, त्यांचे डायरेक्टर बोर्ड, स्वदेशी कमर्शिअल बँक या सर्वांचे कायमचे ऋण संस्थेवर आहे.