विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र - काही समस्या

सौजन्य संदर्भ - लोकसत्ता- मृणालिनी कुलकर्णी, १५ जानेवारी २०१२


माध्यमिक शिक्षकाच्या १२ वर्षांच्या अध्यापन सेवेनंतर ‘वरिष्ठ वेतन श्रेणी’ आणि २४ वर्षांच्या अध्यापन सेवेनंतर (ज्यांनी पदव्युत्तर अर्हता प्राप्त केली आहे) ‘निवड वेतन श्रेणी’ प्राप्त करण्यासाठी शिक्षकांना सेवाअंतर्गत प्रशिक्षण घ्यावे लागते. ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळा’तर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात विषयतज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून जबाबदारी सांभाळताना एका निवृत्त शिक्षिकेला आलेला हा अनुभव. या शिबिरात ‘कुमार अवस्थेतील विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र’ या विषयावरील कार्यशाळेत शिक्षकांना बोलते केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या पुढे आल्या. या समस्या समजून घेणारा हा पूर्वार्ध.

शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे. पण, आपला वेळ, पगार, सोय या पलीकडे न पाहण्याच्या काही शिक्षकांमधील वृत्तीमुळे ही प्रक्रिया शाळेच्या घंटेबरहुकूम चालू लागली आहे. घरातील वातावरण, सामाजिक पाश्र्वभूमी आणि समाजातील बदल यामुळे उद्भवणाऱ्या बालकांच्या निरनिराळ्या प्रकारच्या समस्या समजून घेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, याचे भानही अनेक शिक्षकांना राहिलेले नाही. अशा समस्याग्रस्त मुलांच्या पाठीवरची शिक्षकाची एक कौतुकाची थाप त्याच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवू शकते. नेवासे येथे शिक्षकांचे तीन दिवसांचे प्रशिक्षण घेताना ही बाब मला प्रकर्षांने जाणवली. मुलांच्या किती आणि कोणत्या प्रकारच्या समस्या असू शकतात, याची जाणीव या प्रशिक्षणाच्या निमित्ताने झाली. शिक्षक आपापल्या परीने या समस्या सोडविण्यासाठी कसा हातभार लावू शकतात, याची चर्चाही यावेळी झाली.

या शिबिरात ‘कुमार अवस्थेतील विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र - मार्गदर्शन व समुपदेशन’ या विषयावर व्याख्यान देताना काही स्वानुभव, वृत्तपत्रीय लेख, प्रसिद्ध लेखकाच्या लेखातील उदाहरणे, रचनावादाच्या पद्धतीने काही विद्यार्थ्यांच्या समस्येवर शिक्षकाच्या सहभागासह चर्चासत्र, रोल प्ले (विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक) या पद्धतीतून काही समस्यांचा ऊहापोह केला. तासिकेच्या शेवटी आमच्याच शिबिरातील माझ्यासारखेच मार्गदर्शक असलेल्या सरांच्या सुचनेवरून प्रत्येक शिक्षकाला ‘विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील समस्या व उपाय’ यावर स्वानुभव लिहायला सांगितले. वांद्रे ते दहिसरमधील एका वर्गातील ७२ प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी लिहिलेल्या आणि उपाय सुचविलेल्या स्वानुभवावर आधारित लेखांचे संकलन पुढे देत आहे.

प्रातिनिधिक स्वरूपात असलेल्या बालकांच्या काही समान समस्या पुढीलप्रमाणे

  • शाळेत उशिरा येणे, मधल्या सुट्टीत पळून जाणे
  • गृहपाठ-स्वाध्याय पूर्ण न करणे
  • शाळेत न येता शाळेच्या वेळात बाहेर जाणे
  • लेखन साहित्य, पाठय़पुस्तके, वह्या न आणणे
  • शाळेचा गणवेश व्यवस्थित नसणे (बूट, रिबिन इत्यादी)
  • काही विद्यार्थी सतत गैरहजर असतात. शाळेत अनियमित असणे
  • वर्गात बेशिस्तपणाची वागणूक असणे. बेजबाबदार वर्तन करणे.
  • गोंधळ घालून शिकविताना अडथळा निर्माण करणे
  • अपशब्दांचा सर्रास वापर करणे
  • चोऱ्या करणे, दुसऱ्याचा डबा खाणे, बळाचा वापर करून इतरांना त्रास देणे
  • शाळेतील वस्तूंची तोडफोड करणे, वस्तू खराब करणे
  • शाळा व पालक यांच्यातील परस्पर आंतरप्रक्रिया योग्य न करणे
  • घरात शिक्षणाचा अभाव असणे
  • समजत नसूनही माहिती न विचारणे
  • शाळेच्या किंवा शिक्षकाच्या बाबतीत गैरसमज असणे
  • शिक्षणपद्धती, अभ्यास, परीक्षा इत्यादीविषयी नावड, नाखुषी असणे
  • वाचनाची आवड नसणे
  • सहशालेय कार्यक्रमात भाग न घेणे. संवाद नसणे
  • काही विद्यार्थी स्वत:मध्येच स्वमग्न असतात.
  • काही तासानंतर अस्थिर, चुळबूळ सुरू होते. कोणत्याही कारणास्तव वर्गाबाहेर जाण्यास उत्सुक असणे
  • अध्यापनाच्या वेळी लक्ष बाहेर केंद्रीत असते
  • पौंगडावस्थेतील येणाऱ्या मुलामुलींना एकमेकांबद्दल वाटणारे आकर्षण
  • एसएमएस किंवा कोडवर्ड भाषेचा वापर करणे
  • चित्रपट, टीव्हीसारख्या बाह्य माध्यमांचे अनुकरण करून हातात, गळ्यात चालू फॅशनप्रमाणे वस्तू घालणे किंवा केशरचना करणे.
  • मित्रमंडळींकडून ऐकलेल्या गोष्टीला वाव देणे
  • परीक्षेची , गणिताची विशेष भीती. ‘नापास’ या शब्दाचीही भीती वाटणे.
  • तपासलेल्या उत्तरपत्रिका दिल्यानंतर त्यांत खाडाखोड, खोटे बोलणे, गुण वाढविण्याकडेच कल असणे.

प्रत्येक बालकाच्या समस्या वेगवेगळ्या असतात. त्या समस्यांचे निराकरण करताना शिक्षकांनी विद्यार्थी-पालक यांच्याशी प्रेमाने संवाद साधला पाहिजे. विद्यार्थ्यांशी संबंधित बऱ्याच समस्यांचे मूळ त्यांच्या घरातील कौटुंबिक वातावरणात असते. शिक्षणाचा अभाव, लहान घर, गरिबी, मोठय़ा मुलांवर कामाची जबाबदारी, वडिलांचे दारूचे व्यसन, रात्रीची भांडणे, मारहाण, अर्वाच्य भाषा, घटस्फोटीत कुटुंबे, आर्थिक गरजेपोटी बाहेर छोटी-मोठी कामे करावी लागणे, तेथील चांगले-वाईट अनुभव, पाण्याची-स्वच्छतागृहाची सोय बाहेर असल्याने येणाऱ्या अडचणी अशी अनेक असतात. याचा परिणाम बालकाच्या मनावर होत असतो. या अडचणी पार करून त्यांना शाळेत यावे लागते. अनेकजण पुरेसे अन्न, झोपेअभावी केवळ गणवेश चढवून शाळेत येतात. त्यात काही बालकांना व्यक्तिनुसार, स्वभावानुसार किंवा परिस्थितीनुसार वाईट सवयी लागतात. ती सुरवात असते.

शिक्षकाच्या मार्गदर्शनाने त्यांच्यात बदल होत जातो. अडचणी असूनही बरीचशी मुले अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात आणि यशस्वीही होतात. अडचणीच्या काळात शिक्षकांकडून मिळणारी मदतीची वागणूक, कौतुकाचा, प्रोत्साहनाचा, आत्मविश्वास वाढविणारा हात मिळताच बालकाचा मार्ग बदलतो. भविष्यात यशस्वी होतात. शाळेत येऊन भेटतात. ‘तुमच्यामुळेच मी आज आहे,’ हे मुलांचे उद्गार शिक्षकांना त्यांच्या कामाचे समाधान देतात.

कौटुंबिक वातावरणाबरोबरच समाजातील चंगळवाद, प्रसारमाध्यमे याचा लहान वयाच्या बालकावर खूप परिणाम होतो. शालेय शिक्षणाचा वाढता आवाका, परीक्षा आणि प्रत्यक्ष व्यवहारी जीवन यात दिसत असलेली तफावत. स्वत:साठी स्वातंत्र्य हवेसे वाटणारा या वयातील बालक क्लास व शाळा यात पूर्णवेळ व्यस्त असतो. सर्वत्र सर्वाकडून होणाऱ्या सूचनांमुळे दबलेला बालक मानसिकदृष्टय़ा पूर्णपणे गोंधळलेला असतो. मनाने दुर्बल असलेला बालक आधी अभ्यासापासून, शाळेपासून आणि नंतर घरापासून दूर जाण्याच्या वाटेवर असतो.

वर्गात आणि वर्गाबाहेर बालक वावरत असताना शिक्षक त्यांच्याशी संवाद साधत असतो. प्रोजेक्ट, प्रकल्प, सहशालेय उपक्रम, विविध स्पर्धा या सर्व माध्यमातून विद्यार्थी शिक्षकाजवळ मोकळे होत असतात. तेथेच शिक्षकही त्याला मार्गदर्शन करीत असतात. तरीही वाढते शरीर, लहान बाके, अभ्यासाची नावड, अनेक विषयांचे ओझे यातून छंद-कुवत-क्षमता माहीत नसल्याने नेमके काय करायचे हे बालकांना समजत नाही. काही तासानंतर एकाग्रता ढळते. चुळबूळ सुरू होते. स्वमग्न विचारात राहतात.