विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र - काही उपाय भाग २

सौजन्य - दै. लोकसत्ता मृणालिनी कुलकर्णी, २२ जानेवारी २०१२
‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळा’तर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात विषयतज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून जबाबदारी सांभाळताना एका निवृत्त शिक्षिकेला आलेला हा अनुभव. या शिबिरात ‘कुमार अवस्थेतील विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र’ या विषयावरील कार्यशाळेत शिक्षकांना बोलते केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या पुढे आल्या. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेताना शिक्षक आपल्याच व्यवसायाचा धांडोळा नव्याने कसा घेतात याचा हा अनुभव वाचा लेखाच्या या उत्तरार्धात....


कुठलाही विद्यार्थी हा ‘ढ’ नसतो. आपल्या शब्दकोशात यासारखे काही शब्द काढून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणाऱ्या, त्यांचा उत्साह वाढविणाऱ्या आनंद, प्रेरणा देणाऱ्या शब्दांचा संग्रह करायला हवा. प्रत्येकासाठी संधी आहे, ही जाणीव मुलांमध्ये रुजविली पाहिजे आणि संधी शोधण्यासाठी त्याच्या पाठीवर हात ठेवून ‘फक्त लढ’ म्हटले तरी पुरसे आहे. कारण पुष्कळसे मूर्ख, बेवकूफ समजले जाणारे, मागच्या बाकावर बसणारे जगाला हलवून सोडतात. तेव्हा विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक आहे. त्यांना विश्वासात घेऊन बोलते करणे गरजेचे आहे. पालकांशी संवाद साधून बालकाच्या आवडी, त्यांची बलस्थाने, मर्यादा याची जाणीव शिक्षकांनी करून दिली पाहिजे. पालकांनीही पाल्याला समजून घेतले पाहिजे. त्याच्याशी सतत संवाद साधला पाहिजे. त्याच्या छंदाला घरी वेळ दिला पाहिजे. त्याची मते विचारात घेतली पाहिजे. ‘जिंकू किंवा शिकू’ या तत्त्वावर स्पर्धेत भाग घ्यायला प्रोत्साहन दिले पाहिजे. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल. त्यांचे मन पालकांनी ओळखावे. अभ्यासाची गोडी लागण्यास हे प्रयत्न उपयोगी येतात, हे या प्रशिक्षणात प्रकर्षांने पुढे आले.

काही विद्यार्थी अंतर्मुख असतात. असाच एक विद्यार्थी जो बोलण्यास उत्सुक नव्हता, त्याच्याशी एका शिक्षकाने सर्व विषयांवर वेगवेगळी चर्चा केली. रोजच्या रोज बोलून त्याच्या कमतरतेची जाणीव करून दिली. बहिर्मुख स्वभावाचा त्याला कसा आणि कोणत्या क्षेत्रात फायदा होईल हे अनेक उदाहरणावरून पटवून दिले. तो थोडा बोलका झाला. शाळा बुडवून व्हिडीओ गेम खेळणारा, तर बाहेर उनाडक्या करणारा, अशीही दोन्ही प्रकारची मुले शिक्षकांनी केलेले समुपदेशनामुळे शाळेत येऊ लागली. शिक्षकांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे काहींनी चित्रकलेच्या परीक्षा दिल्या. त्यातील एका बालकाचे चित्रकलेतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचे जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रांचे प्रदर्शन भरले होते. या मुलाने त्या शिक्षिकेला घरी येऊन प्रदर्शनाला उपस्थित राहण्यासाठी आग्रहाने आमंत्रण दिले, तर दुसरा विद्यार्थी कमर्शिअल आर्टिस्ट म्हणून यशस्वी होऊन मोठय़ा हुद्दय़ावर प्रथितयश कंपनीत नोकरीला आहे. जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकलेला हा विद्यार्थी पदवी परीक्षेला राज्यातून पहिला आला होता.

गणित विषयाबद्दल बऱ्याच मुलांना भीती असते. या विषयातील ‘नापास’चा शेरा त्यांचे मन खच्ची करतो. गणिताच्या संकल्पना स्पष्ट न झाल्याने पहिल्यापासून मनात भीतीच असल्याने ‘मला गणित जमणार नाही’, असा समज करून घेणारे विद्यार्थी बरेच आहेत. गणिताच्या तासाला त्यांच्या चेहऱ्यावर हा ताण स्पष्ट दिसतो. दबलेली, चेहरा लपविणारी ही मुले या तासाला मानही वर करीत नाहीत.

गणिताला सर्वसामान्य गणिताचा पर्याय आहे. तसेच गणित म्हणजे आयुष्य नव्हे. गणिताशिवायच्या खूप शाखा असून त्यात तुम्हाला शिकता येईल. शाळास्तरावर नापास झालेले पण नंतरच्या आयुष्यात यशस्वी झालेल्यांची उदाहरणे विद्यार्थ्यांनी दिली की त्यांचे मनोबल वाढते. ते थोडे मोकळे होतात. विद्यार्थी मित्रमैत्रिणींकडूनच त्यांची जादाची उजळणी घेतली की ते मोकळेपणाने बोलतात. त्यांचा विषयाचा ताण कमी होतो. कधीकधी पास होण्यापुरती किंवा त्याहूनही अधिक प्रगती करताना दिसून येतात, असे काही शिक्षकांच्या अनुभवातून पुढे आले.

भाषा-विज्ञान आदी विषयांत गोडी लागण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग, जबाबदारी वाढविण्याच्या गोष्टी शिक्षकांना करता येतील. त्यांच्यावर गृहपाठासाठी प्रश्न काढणे, तपासण्यास देणे अशा जबाबदाऱ्या टाकल्या की ते आनंदाने ही कामे करतात. हे काम करण्याच्या जबाबदारीपोटी ते स्वत:चा गृहपाठही पूर्ण करून येतात.

या झाल्या अध्ययनाबाबतच्या समस्या. काही शिक्षकांनी नेहमीपेक्षा वेगळ्या समस्या हाताळून मुलांमध्ये सुधारणा घडवून आणली होती. एका वर्गातील तीन विद्यार्थिनी सिगरेटी ओढताना आढळून आल्या. शिक्षकांनी दमात घेताच त्यापैकी एक फॅशन-आकर्षण म्हणून सिगरेट ओढत होती. दुसरी घरातील गरिबी आणि त्यामुळे येणाऱ्या ताणापायी सिगरेट ओढत होती, तर तिसरीचे वडील चेनस्मोकर होते. ती पानपट्टीवरून वडिलांना दररोज सिगरेटी आणून देत असे. कुतूहल जागृत झाले म्हणून तिने सिगरेट ओढायला सुरुवात केली. शिक्षिकेने या मुलींशी संवाद वाढविला. सिगरेटी ओढण्याचे तोटे, त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगितले. त्यानंतर या तिघींची सिगरेट सुटली.

एका इयत्ता पाचवीच्या शिक्षिकेच्या वर्गातील डिक्स्लेसियाचा एक बालक. हा ‘स्लो लर्नर’ नव्हता. पण, तो अक्षरे उलटे लिहीत असे. म्हणजेच त्याचा केवळ लिखाणाचा प्रश्न होता. या शिक्षिका त्याला शाळा सुटल्यानंतर दररोज पंधरा मिनिटे लिहून दाखविण्याचा प्रयत्न करीत असत. केवळ लिखाणाचा प्रश्न असला तरी तो सोडविण्यासाठी या शिक्षिकेला तीन वर्षे लागली. शिक्षिकेच्या निरंतर प्रयत्नांनंतर नववीमध्ये या मुलाच्या लिखाणात सुधारणा दिसून आली.

एका वर्गातील पंधरा विद्यार्थी खूपच मस्तीखोर आणि काहीही ऐकून न घेण्याच्या स्थितीतली होती. शिक्षक शिकवीत असताना विचित्र आवाज काढून ते अडथळा आणीत असत. सर्वानीच या मुलांसमोर हात टेकले होते, पण शिक्षकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवत या मुलांशी संवाद साधला. त्यांची दररोज विचारपूस करून हे शिक्षक त्यांच्याशी जवळीक साधू लागले. हळूहळू या मुलांचा द्वाड स्वभाव निवळला. ती वर्गात आपली मते मांडू लागली. चर्चेत भाग घेऊ लागली.

आपल्या आत्याकडे राहावयास असलेल्या एका विद्यार्थिनीचे अभ्यासात बिलकूल लक्ष नव्हते. आईवडिलांकडे राहत नसल्याचे हे परिणाम असल्याचे शिक्षिकेच्या लक्षात आले. त्यांनी आईवडिलांना बोलावून घेतले. नोकरीच्या कारणास्तव मुलीला आत्याकडे ठेवावे लागत असल्याचे पालकांचे म्हणणे होते. या शिक्षिकेने पालकांचे मन वळविले. शेवटी मुलीसाठी त्यांनी भाडय़ाची जागा घेतली. त्यानंतर त्या मुलीच्या अभ्यासात सुधारणा दिसून आली.

काही शिक्षकांतही समस्या असल्याचे दिसून आले. काही शिक्षक काळ्यासावळ्या व सुंदर नसणाऱ्या मुलांकडे इतरांच्या तुलनेत दुर्लक्ष करतात. त्यांच्या समस्या समजून घेतल्या जात नाहीत. त्यांच्याकडे पूर्वग्रहदूषित भावनेने बहुतेक शिक्षक वागताना दिसतात. काहीजण मुलांपेक्षा मुलींना प्राधान्य देतात. विद्यार्थीही अशा शिक्षकांकडे आपले प्रश्न घेऊन जाण्यास संकोच करतात, म्हणूनच शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांशी समानतेने वागावे. त्यांना इतरांसमोर अपमानित करू नये. विश्वासात घेऊन मदत करावी, अशा सूचना या वेळी पुढे आल्या.

काही शिक्षकांनी ५०-६० प्रवेशक्षमता असलेल्या वर्गात ९५ विद्यार्थी दाटीवाटीने बसवावे लागल्याने निर्माण झालेल्या समस्यांचा पाढा वाचला. पालकांच्या तक्रारी, दाटीवाटीने बसावे लागल्याने होणारा उकाडा, अस्वस्थपणा अशा कितीतरी समस्या शिक्षकांनी मांडल्या. तरीही बरेच शिक्षक आपली शाळेची कामे सांभाळून मुलांच्या अनेक समस्या अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळत होते. या प्रकारच्या प्रशिक्षणात आपल्याच व्यवसायाशी नव्याने संवाद साधण्याची संधी मिळते. विचारांची देवाणघेवाण होते. आपल्या पुढील उद्दिष्टांची नव्याने जाणीव होते. मानसिकता बदलते. शिक्षक आपल्या व्यवसायाचा नव्याने शोध घेतो. नव्याने निकष तपासले जातात. बरेच शिक्षक स्वत:चा जादा वेळ, पैसा, मेहनत मुलांना देत असतात. शेवटी शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे आणि अध्यापकाचा व्यवसाय हा सात-आठ तासांपुरता मर्यादित असू शकत नाही!