एनटीएसची तयारी

एनटीएसची तयारी का आणि कशी करावी ?प्रा. आर. सी. जोशी http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-divya-education-magazine-nts-2494493.html

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा अर्थात नॅशनल टॅलंट सर्च ही शालेय स्तरावरील सर्वश्रेष्ठ परीक्षा आहे. आठवीमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांसाठीच ही परीक्षा आहे. म्हणूनच त्याचे फायदे आठवीपासूनच मिळत आहेत. एनटीएसमध्ये महाराष्ट्र सातत्याने अग्रेसर आहे. राज्य आणि राज्यातील विद्यार्थी देशात सर्वप्रथम येण्याचा मान महाराष्ट्राला सातत्याने मिळत आहे. जवळपास 30 टक्के एनटीएस स्कॉलर्स प्रतिवर्षी महाराष्ट्राचेच असतात. ही परीक्षा फक्त निवड होणाºयांसाठीच नव्हे तर या परीक्षेत नापास होणाºयांसाठीही तितकीच फायद्याची आहे. म्हणून तर प्रत्येक हुशार विद्यार्थी ही परीक्षा देतोच. या परीक्षेचा सर्वाधिक फायदा म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांची क्षमता लक्षात येते. भाषा विषय सोडला तर आठवीचा सर्व अभ्यास अगदी परिपूर्ण आणि शेवटच्या पानापर्यंत आॅक्टोबरपर्यंत तयार करावाच लागतो. आता पुढील सहा महिने काय करायचे? तो राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करू शकतो. आयआयटी, एआयपीएमटी फाऊंडेशन कोर्सेस करू शकतो. या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी उपलब्धी आहे.

आठवीप्रमाणेच नववी आणि दहावीमध्येही हे हुशार विद्यार्थी त्यांचा शालेय अभ्यासक्रम शाळा सांभाळून फक्त अर्ध्या वर्षात करतात. वर्षातील बाकी अर्धा वेळ त्याला फाऊंडेशन, गणित, विज्ञान ऑलिम्पियाड आणि इतर राष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक्रमातील संकल्पनांच्या उपयोजिततेचा सराव आणि त्यातील यशासाठी देऊ द्या. त्याला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर झेपावू द्या.

फायदे काय?- नववीपासून ते शिक्षण पूर्ण होईपर्यंत यू. जी., पी. जी. ते पीएच. डी. पर्यंत दरमहा मिळणारी एन. टी. एस. घेऊनही दुसरी शिष्यवृत्ती घेता येते. राष्ट्रीय पातळीवरील अनेक शैक्षणिक, वैज्ञानिक इत्यादी महत्त्वाच्या कार्यक्रमात एन. टी. एस. स्कॉलर्स निमंत्रित असतात. अर्थात सर्व खर्च शासनाचाच. परंतु या सर्व फायद्यांमध्ये महत्त्वाचा फायदा आहे तो हा की, एन. टी. स्कॉलर विद्यार्थी शिक्षक, प्राचार्याच्या नजरेत राहतो. सवलतीबरोबर मानही मिळतो.

दोन पेपर्स- एन. टी. एस. ई. परीक्षेसाठी दोन पेपर्स असतात. पहिल्या राज्यपातळीवरील परीक्षेसाठी तसेच दुसºया राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेसाठीसुद्धा राज्यपातळीवरील परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांनाच राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा देता येते. एक पेपर असतो मानसिक क्षमता कसोटी तर दुसरा असतो शालेय प्रवीणता कसोटी. प्रत्येक पेपर 100 मार्कांचा. संपूर्ण परीक्षा 200 मार्कांची. राज्यपातळीवरील या वर्षीची परीक्षा 20 नोव्हेंबर रोजी आहे. प्रथम राज्यपातळीवरील परीक्षेच्या तयारीचे बघू.

शिबिरे आणि पुस्तके- एन. टी. एस. ई. परीक्षेसाठी अनेक पुस्तके दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. अनेक मार्गदर्शन वर्गही आहेत. ग्रामीण भागातसुद्धा दिवाळीच्या सुटीत अनेक शिबिरेही होतात. मानसिक क्षमता कसोटी पेपरचा अभ्यास आणि प्रश्नावली एन. टी. एस. ई. च्या प्रत्येक पुस्तकात सापडतात. तथापि, व्ही. एन. दांडेकर आणि एम. जी. एस. ई. ची पुस्तके या पेपरसाठी प्रसिद्ध आहेत. प्रत्येक विद्यार्थी ही दोन पुस्तके वाचतोच, त्यातील प्रश्न सोडवतो. प्रत्येक पुस्तकांच्या दुकानात ही पुस्तके उपलब्ध आहेत.

असा करा सराव- शालेय प्रावीण्य कसोटीच्या पेपरकरिता आठवीचा राज्य मंडळाचा अभ्यासक्रम असतो. अर्थात प्रश्नांची काठीण्य पातळी, आधीच्या वर्गाच्या अभ्यासक्रमाचा संदर्भ, सर्वसामान्य ज्ञान आणि किंचित अभ्यासक्रमाबाहेरीलही असणारच. राज्यपातळीवर एन. टी. एस. ई. च्या पहिल्या परीक्षेसाठी अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यातील प्रश्नपत्रिका सोडवाव्या. राष्ट्रीय पातळीवरील पुस्तकातीलसुद्धा. महाराष्ट्र राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाप्रमाणे आणि किंचित अधिकचे जेवढे प्रश्न सापडतील तेही सोडवावेच. सर्वच पुस्तकात समान प्रश्नच अधिक असतात. अर्थात प्रत्येक पुस्तकातील थोडे वेगळे असणारे प्रश्नच अत्यंत उपयोगाचे ठरतात. त्यावरच निवड होत असते. परीक्षेत सर्व विद्यार्थ्यांना जे येते ते तर आलेच पाहिजे, परंतु बहुतेकांना जे प्रश्न जमले नाहीत ते ज्यांना सोडवता आले, त्यांचीच निवड होत असते हे पक्के लक्षात ठेवूनच सराव करा. या परीक्षेत एक दोष मानतात. यात निगेटिव्ह मार्किंग नसते. त्यामुळे प्रत्येक प्रश्न सोडवावाच. त्यामुळे मार्क्स वाढतातच. येत नसल्यास अंदाजाने योग्य उत्तर निवडता येते. त्याकरिता अगोदर खूप सराव केल्यास परीक्षेत फायदा होतो. परीक्षेची भीती वाटत नाही. विश्वास वाढतो.

शिबिरे महत्त्वाची- या परीक्षेतील यशासाठी परीक्षेपूर्वी होणारे शिबिर महत्त्वपूर्ण ठरते. शिबिरातील इतर हुशार मुलांबरोबरची उपस्थिती, मिळणारे मार्गदर्शन आणि दरदिवशी पूर्ण परीक्षेप्रमाणेच पेपर्सचा घड्याळ लावून केलेला सराव, त्यातील मार्क्स, प्रत्येक पेपरची विषयातील त्या-त्या अनुभवी तज्ज्ञांकडून होणारी चर्चा, इत्यादींमधूनच खरी तयारी होत असते. विद्यार्थी आणि पालकांनी या आॅक्टोबर-नोव्हेंबरमधील साधारणपणे 20 दिवस होणाºया या शिबिराची नीट माहिती घ्यावी. काही विषय घरी तुम्हीच वाचून तयार करा. पूर्ण पेपरऐवजी थोडेच प्रश्न घेऊ, घड्याळ लावून सराव नको. असे नको तसे नको ऐकवणारी शिबिरे नकोच. पहिल्या व दुसºया पेपरच्या पूर्ण 100 मार्कांच्या टेस्ट्स किती होणार याची अगोदरच माहिती घ्यावी . प्रत्येक पेपरमधील त्या त्या विषयाच्या अनुभवी तज्ज्ञांशी लगेच चर्चा करून आणि त्यांच्याकडून चुका सांगून प्रत्येक पेपरनंतर योग्य दिशा देऊन पुढील पेपरसाठी सूचना मिळतील का हेही विचारून घ्यावे.

पालकांनीही ध्यानात ठेवावे- एकापेक्षा अधिक शिबिरात जाण्याने वेळ, पैसा जाऊन विद्यार्थी नापास झाल्यास विद्यार्थी व त्याचे पालकच जबाबदार ठरतात. सतर्क विद्यार्थी आणि जागृत पालकच योग्य शिबिराची निवड निश्चित करू शकतात. परीक्षेपूर्वीच्या या अभ्यासपूर्ण सराव शिबिराला अनन्यसाधारण महत्त्व आलेले आहे हे विसरू नका. वेळेवर क्लास सुरू होणे, प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ अनुभवी फॅकल्टी वेळेवर येणे, परीक्षेच्या दर्जाचे पूर्ण 100 मार्कांचे पेपर्स असणे, मार्कस लगेच मिळाल्यामुळे, आलेला रँक माहिती होण्यामुळे, चर्चा व योग्य दिशा लाभल्यामुळे, विद्यार्थ्यांचे मार्कस वाढत जातात. त्याचा आत्मविश्वास वाढतो.