राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद

संदर्भ - लोकप्रभा २ मार्च २०१२ अनिल मानेकर

अणुऊर्जा कार्यक्रम, अवकाश संशोधन, कृषिविज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, संरक्षण, औद्योगिक उत्पादन अशा अनेक क्षेत्रांत आज आपण लक्षणीय कामगिरी केली आहे. गेल्या काही दशकांमध्ये भारतीयांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत मुसंडी मारली आहे आणि संपूर्ण जगाला त्याची दखल घ्यावी लागलेली आहे. परंतु तरीही आपण अजूनही विकसित राष्ट्रांच्या तुलनेत मागे आहोत ही कटू वस्तुस्थिती आहे.

आपल्या देशाला जवळजवळ पाच हजार वर्षांची वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाची महान परंपरा लाभली आहे. गणित, खगोलशास्त्र, औषधविज्ञान, धातुविज्ञान, वस्त्र विणकाम, इ. क्षेत्रांमध्ये भारतीयांचं खूप महत्त्वाचं योगदान आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विज्ञान संशोधनाचं महत्त्व वेळीच ओळखून वैज्ञानिकांना सतत प्रोत्साहन दिलं. विज्ञानावरचा त्यांचा दृढ विश्वास व्यक्त करताना ते एकदा म्हणाले, ‘‘वैज्ञानिक संस्था म्हणजे आपल्या आधुनिक भारताची मंदिरं आहेत. अशा संस्थांवर आपल्या देशाच्या बांधणीची आणि विकासाची अतिशय मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी आहे. नेहरूजींच्या प्रोत्साहनामुळे अनेक मूलभूत विज्ञान संशोधन संस्था आपल्या देशात सुरू झाल्या आणि अनेक मोठे प्रकल्प उभारले गेले. अणुऊर्जा कार्यक्रम, अवकाश संशोधन, कृषिविज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, संरक्षण, औद्योगिक उत्पादन अशा अनेक क्षेत्रांत आज आपण लक्षणीय कामगिरी केली आहे. गेल्या काही दशकांमध्ये भारतीयांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत मुसंडी मारली आहे आणि संपूर्ण जगाला त्याची दखल घ्यावी लागलेली आहे. परंतु तरीही आपण अजूनही विकसित राष्ट्रांच्या तुलनेत मागे आहोत ही कटू वस्तुस्थिती आहे.

आपल्या देशाची लोकसंख्या भरपूर असूनही वैज्ञानिक संशोधनाच्या बाबतीत आपण खूप मागे आहोत ही एक महत्त्वाची त्रुटी आहे. याकरिता आज आवश्यकता आहे ती वैज्ञानिक दृष्टिकोन तरुण पिढीमध्ये रुजविण्याची, त्यांच्या कुतूहलबुद्धीला प्रोत्साहन देण्याची. हीच तरुण पिढी पुढे नंतर आपल्या देशाचे योग्य नेतृत्व करून आपली भरभराट होऊ शकेल आणि आपण विकसित देशांच्या यादीमध्ये स्थान मिळवू शकू.

आपल्या देशामध्ये विविध प्रदेशांमध्ये विविध भाषा बोलणारे समाज आहेत. त्यांमध्ये अनेक अंधश्रद्धा आहेत. त्यांच्या कुतूहलबुद्धीला चालना देणारी साधनं सहज उपलब्ध नाहीत. या अडचणींवर मात करण्यासाठी ‘राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद’ या संस्थेची स्थापना १९७८ मध्ये झाली. या संस्थेच्या प्रमुख उद्दिष्टांमध्ये देशभरात विज्ञान केंद्रांचं जाळं निर्माण करणे, विज्ञानावर आधारित विविध कार्यक्रम राबवून विज्ञान लोकप्रिय करणं, जनसामान्यांमधील अंधश्रद्धा दूर करणं, विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोग स्वत: करण्यासाठी संधी उपलब्ध करून देणं अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. याप्रमाणे राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेने गेल्या तेहतीस वर्षांमध्ये एकंदर पन्नास विज्ञान केंद्रांची निर्मिती केलेली आहे. ही सर्व विज्ञान केंद्रे देशाच्या विविध भागांमध्ये विखुरलेली आहेत आणि आपापल्या क्षेत्रांमध्ये विज्ञान प्रसाराचं काम करत आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास विज्ञान केंद्र कलकत्ता, बंगळुरू, मुंबई, दिल्ली, नागपूर, लखनौ, पटना, गुलबर्गा अशा अनेक लहान-मोठय़ा गावांमध्ये स्थापन केली आहेत. प्रत्येक विज्ञान केंद्रामध्ये विज्ञान उद्यान आणि वैज्ञानिक प्रयोग वेगवेगळ्या दालनांमध्ये मांडलेली असतात. या प्रयोगांचे वैशिष्टय़ म्हणजे या प्रयोगांमार्फत मनोरंजन आणि ज्ञानार्जन हे दोन्हीही साध्य होते.

शाळा-कॉलेजमध्ये आपण शिकणाऱ्या पद्धतीपेक्षा विज्ञान केंद्राची पद्धत वेगळी परंतु आकर्षक असते. विज्ञान केंद्रातील प्रयोग आपल्याला स्वत: करायचे असतात आणि ते करत असताना विज्ञानाचा अनुभव घ्यायचा असतो. विज्ञान हा केवळ वाचनाचा विषय नव्हे तर प्रयोगातून शिकण्याचा विषय आहे अशी रचना विज्ञान केंद्रामध्ये केलेली असते. विज्ञान उद्यानामध्ये हसत-खेळत विज्ञान शिकण्याची अनेक प्रात्यक्षिकं असतात. निसर्गाच्या सहवासात विज्ञान उद्यानामध्ये प्रयोग स्वत: करण्याची मजा काही औरच असते. मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्रामध्ये वेगवेगळ्या विषयांची दालनं आहेत. उदा. मुलांसाठी विज्ञान, ध्वनी, प्रकाश, मानवी उत्क्रांती, अंतराळ विज्ञान, कम्प्युटर्स, भारतीय तंत्रज्ञानाचा वारसा, इ. विषयांवरील अनेक दालनं आहेत. मानवी जीवशास्त्र या दालनामध्ये एका मोठय़ा हृदयाच्या कृतीमधून आपण जाऊ शकतो आणि हृदयाच्या आतील गोष्टी जसे हृदयाचे मुख्य विभाग, हृदयातील वेगवेगळ्या झडपा प्रत्यक्ष पाहू शकतो आणि हृदयाचं कार्य समजून घेऊ शकतो. दुसऱ्या दालनामध्ये क्षितिज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेमध्ये कसे होते हे आपण स्वत: अनुभवू शकतो. अणुऊर्जेवरील दालनामध्ये अणूपासून ऊर्जा कशी मिळवता येते, त्याचे आपल्या शरीरावर होणारे चांगले-वाईट परिणाम कोणते, ऊर्जेची आपल्याला किती आवश्यकता आहे, ती कशाकशापासून प्राप्त होऊ शकते, अणुऊर्जा सुरक्षित ऊर्जा आहे का? इ. प्रश्न प्रयोगांमधून सोडवू शकतो. अनेक दालनांमध्ये त्रिमित प्रयोग मांडले आहेत जे सर्व वयोगटातील व्यक्तींना आकर्षति करत असल्यामुळे विज्ञान शिकण्याची सगळ्यांनाच इच्छा होते. वैज्ञानिक प्रयोगांबरोबरच अनेक उपक्रम विज्ञान केंद्रांमध्ये राबविले जातात. अंधश्रद्धा निर्मूलन या उपक्रमामध्ये नारळातून अग्नी उत्पन्न करणे, विस्तवावर चालून दाखविणे असे चमत्कारिक प्रयोगदेखील करून दाखविले जातात आणि हे करत असताना त्यामध्ये चमत्कार वगरे काहीही नसून वैज्ञानिक तथ्य आहे हे दाखवलं जातं. याचा प्रमुख उद्देश म्हणजे असल्या चमत्कारिक प्रयोगांना भुलून लोकांनी बुवाबाजीवर विश्वास ठेवू नये.

शहरांप्रमाणेच खेडय़ापाडय़ातील जनतेला विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणून फिरते विज्ञान प्रदर्शनसुद्धा प्रत्येक विज्ञान केंद्रात असतं. प्रदर्शनाची ही बस छोटे प्रयोग आणि प्रात्यक्षिकं घेऊन ठिकठिकाणी जाते. खगोलशास्त्रामधील कुतूहल क्षमविण्यासाठी दुर्बिणींमधून आकाश निरीक्षणाचे कार्यक्रमसुद्धा विज्ञान केंद्रात केले जातात. विज्ञान जत्रांमध्ये आपले स्वत:चे प्रयोग मांडून ते इतरांना समजावण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये शिक्षकांना वैज्ञानिक साहित्य निर्माण करायला शिकविले जाते. वेगवेगळ्या स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी विज्ञान केंद्रांमध्ये करून घेतली जाते. लोकप्रिय विज्ञान व्याख्यान या कार्यक्रमांतर्गत मोठमोठय़ा संशोधकांना भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी सर्वाना मिळते. यामध्ये नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञदेखील सहभागी होतात. आंतरराष्ट्रीय विज्ञान ऑलिम्पियाड स्पध्रेमध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांची निवडदेखील विज्ञान केंद्रांमध्ये केली जाते. अशा अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये विज्ञान हे सगळ्यांसाठी आहे आणि विज्ञान मनोरंजक आहे हा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो.

भारतातील नामवंत संशोधन संस्था दरवर्षी ‘सायन्स एक्स्पो’ या कार्यक्रमात सहभागी होत असतात. याअंतर्गत भारताच्या कानाकोपऱ्यातील संशोधनकार्य करणाऱ्या लहान-मोठय़ा संस्थांना यामध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या वैज्ञानिकांशी संवाद साधता येतो. यामधून तरुणांना संशोधकांच्या कार्याबद्दल माहिती मिळते, तसेच विज्ञान विषयातील वेगवेगळ्या विषयांची ओळख होऊन रोजगाराच्या संधीची माहिती मिळते. ‘सायन्स एक्स्पो’चे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे सामान्य नागरिकांपर्यंत विज्ञान हा विषय सोप्या भाषेत पोहोचावा यासाठी वैज्ञानिक विविध वयोगटांतील लोकांच्या आकलन क्षमतेनुसार त्यांच्याशी संवाद साधताना दिसतात.

मुलांनी सुट्टीचा सदुपयोग करावा व त्यांच्या छंदाला योग्य चालना मिळून त्यामध्ये करियर करण्याच्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी सर्व विज्ञान केंद्रांमध्ये सुट्टीत रोबोटिक्स, रॉकेटच्या प्रतिकृती तयार करणे, एरो मॉडेिलग, इलेक्ट्रॉनिक्स, इ. विषयांवरील छंद वर्गाचे आयोजन करण्यात येते. मुलं कागदी रॉकेट तयार करतात आणि त्यांना दिवाळीच्या फटाक्याचे इंजिन बसवून स्वत: बनवलेल्या लाँचरवरून त्याचे प्रात्यक्षिक करून पाहतात. रॉकेट उडविल्यानंतर ते किती उंचीपर्यंत गेले हे मोजण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरणही ते स्वत:च तयार करतात. छोटे यांत्रिक रोबोट बनवून त्यांच्यात स्पर्धासुद्धा लावल्या जातात. दृश्यमाध्यम हे सर्वाधिक प्रभावी माध्यम आहे. आजच्या तंत्रयुगातील थ्रीडी तंत्रज्ञानाचं महत्त्व लक्षात घेऊन थ्रीडी सायन्स शोद्वारे पर्यावरण संरक्षणासारख्या विषयांवरील थ्रीडी चित्रपटांचे खेळही लहान मुले आणि तरुणांसाठी आयोजित करण्यात येतात.

दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान परिषदेचेही आयोजन करण्यात येत असते. त्यानिमित्ताने त्या वर्षीचा सर्वाधिक चच्रेतील विषय विद्यार्थ्यांना दिला जातो. त्या विषयावर विचारमंथन करून विद्यार्थ्यांना प्रथम शाळा, गाव, जिल्हा, राज्य आणि शेवटी देश हे टप्पे पार करत आपले विचार मांडण्याची संधी मिळत असते. देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांची एकाच विषयावरील काय मतं आहेत हे जाणून घेण्याच्या दृष्टीने ही परिषद खूप मोलाची कामगिरी बजावत असते. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकोप्याची भावनाही वाढीस लागत असते. दिल्लीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून पोलंडचे राजदूत उपस्थित होते. त्यांनी या परिषदेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पोलंड सरकार स्वखर्चाने पोलंडमधील ज्या प्रयोगशाळेत मेरी क्यूरी यांनी काम केले तेथे घेऊन जाण्याचेही जाहीर केले आहे. त्यामुळेच या परिषदेला आता आंतरराष्ट्रीय परिमाण प्राप्त झाले असून भविष्यातही यातील सहभागी विद्यार्थ्यांना अशा अनेक संधी उपलब्ध होतील यात शंका नाही. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलम्पियाड (ज्युनिअर ग्रुप) स्पध्रेसाठी विद्यार्थ्यांची निवड ही विज्ञान केंद्रांमार्फत केली जाते. मागच्या वर्षी कझाकिस्तान येथे पार पडलेल्या ऑलम्पियाडमध्ये पहिल्यांदाच तीन विद्यार्थ्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्या तिघांनीही सुवर्ण, रजत आणि कांस्य अशी तीन पदके मिळवत एका विद्यार्थ्यांने सर्व देशांमधील प्रतिनिधींमधून प्रथम येण्याचा मानही मिळविला होता. याचाच अर्थ वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा म्हणून सर्व विज्ञान केंद्रांतर्फे वर्षभर विविध वयोगटांतील लोकांसाठी व विशेषत: विद्यार्थ्यांसाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं. त्यामुळे विज्ञान केंद्राचे सभासदत्व स्वीकारल्यास वेळोवेळी कार्यक्रमांची माहिती आपल्याला मिळत राहते व त्यातून ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही गोष्टी साध्य होतात. (प्रस्तुत लेखक नेहरू विज्ञान केंद्र, वरळी या संस्थेचे संचालक आहेत)

This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.